बंद असलेल्या खाणींवर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान, म्हणाले…

लिलाव किंवा महामंडळ दोनच पर्याय

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : आज खाण असोसिएशनला भेटून मुख्यमंत्री प्रमोद सावंत चर्चा करणार आहेत. दिल्लीत गेले असता मुख्यमंत्र्यांनी खाणमंत्रींसोबतच गृहमंत्र्यांशीही खाण सुरु करण्याबाबत चर्चा केली. खाण सुरु करण्यामागे सर्वसामान्य खाण कामगारांच्या आयुष्याबाबत चिंता आमच्या सरकारला आहे, असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलंय. मात्र त्याआधी त्यांनी खाणप्रश्नावर महत्त्वाचं आणि मोठं विधान केलंय.

दोनच पर्याय!

गोव्यात मायनिंगवर तोडगा काढण्यासाठी सरकार पुढे दोनच पर्याय असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. लिलाव किंवा महामंडळ या दोन पर्यायांवर केंद्रासोबत चर्चा सुरु असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. ओटीएस योजनेच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलंय.

दोन दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री दिल्लीत गेले होते. त्यावेळी त्यांनी खाणी सुरु करण्याबाबत केंद्र सरकारही प्रयत्नशील असल्याचं म्हटलं होतं. खाणमंत्री प्रल्हाद जोशी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली होती. या चर्चेत खाणप्रश्नावर काय तोडगा निघतो का, यावर महत्त्वपूर्ण चर्चा झाली असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

प्रकल्पांना विरोध आणि मुख्यमंत्री म्हणतात…

तीन वेगवेगळ्या प्रकल्पांना एकत्रितपणे पाहण चुकीचं आहे. कोळशासाठी सगळं सुरु आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. कोणताही प्रकल्प कोळशासाठी सुरु नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. सागरमलामधील चार प्रकल्प शक्य नाही, असंही सांगितलेलं आहे.

एमपीटीमध्ये केल्या जाणाऱ्या कोळसा हाताळणीबाबतही मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाचं विधान केलंय. गोवा राज्य प्रदूषण मंडळालाही महत्त्वाचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. सध्या किती कोळसा हाताळला जातो आहे, त्यामुळे किती प्रदूषण होतं, हे पुन्हा तपासायचे आदेश दिले आहे. जर त्यात चिंताजनक अहवाल समोर आला, तर कोळसा हाताळणी कमी करण्याचे आदेश दिले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

पाहा संपूर्ण पत्रकार परिषद

पाहा बातमी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!