डिचोली अर्बनच्या अध्यक्षपदी ‘यांची’ निवड

संचालक मंडळाची बिनविरोध निवड : प्रवीण झांट्ये उपाध्यक्ष

महेश दिवेकर | प्रतिनिधी

डिचोली : सहकार क्षेत्रात उत्तम नाव कमावलेल्या डिचोलीतील डिचोली अर्बन सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बिनविरोध निवड झाली असून अध्यक्षपदी गुरुदत्त संझगिरी यांची, तर उपाध्यक्षपदी आमदार प्रवीण झांट्ये (Pravin Zantye) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
आर्थिक क्षेत्रात बँकिंग क्षेत्रात अग्रणी असलेल्या या बँकेने सेवा, शिक्षण, आरोग्य व इतर बाबतीतही योगदान दिले आहे. नव्या योजना, नवे संकल्प घेऊन ग्राहकांना उत्कृष्ट आणि पारदर्शक सेवा देण्यासाठी नवीन संचालक मंडळ कटिबद्ध आहे, असे नवनिर्वाचित अध्यक्ष गुरुदत्त संझगिरी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
या बँकेच्या संचालकपदी उमेश झांट्ये, डॉ. शेखर साळकर, रामचंद्र गर्दे, विनायक शिरोडकर, रामानंद नाटेकर, पल्लवी साळगावकर, सुदेश नाईक, रोहित झांट्ये, रोहिदास जल्मी व सुविधा कडकडे यांची निवड झाली आहे.
बँकेच्या डिचोली येथील मुख्य कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सहकार खात्याचे सहकार निबंधक सोनू गावणेकर उपस्थित होते.
माजी खासदार हरीश झांट्ये व त्यांच्या सहकार्‍यांनी या बँकेची स्थापना केली. आज राज्यभरात या संस्थेने बँकिंग क्षेत्रात मोठे नावलौकिक प्राप्त केले आहे. डिचोली अर्बन सहकारी बँकेचे आज 60 हजार भागधारक असून त्या सर्वांनी या संचालक मंडळावर आपला विश्वास दाखविला आहे. त्यामुळेच या पुढील कार्यकाळासाठी या संचालक मंडळाची बिनविरोध निवड करून दिली आहे. सर्व व्यवहार पारदर्शक ठेवताना बँकेच्या व्यवहारात किंवा कर्ज वितरणात संचालक मंडळ कधीच ढवळाढवळ करीत नसल्याने बँकेचे सर्व पातळीवरील कार्य चांगल्या पद्धतीने चालत आहे, असे यावेळी अध्यक्ष गुरुदत्त संझगिरी यांनी सांगितले.
जागतिक पातळीवर मंदी असूनही डिचोली अर्बन बँकेची वाटचाल चांगली आहे. यापूर्वी खाण बंदीचे संकट तसेच पर्यटन व्यवसायातही आलेली मंदी यामुळे कर्ज वसुलीत अनेक संस्थांना समस्येला सामोरे जावे लागले आहे. मात्र या बँकेला फारशी अडचण आली नाही, असे संचालक डॉ. साळकर यांनी सांगितले.

निव्वळ नफा 2.33 कोटी
या बँकेचे 60 हजार भागधारक असून राज्यातील विविध भागांमध्ये 11 शाखा आहेत. एक विस्तार काउंटर आहे. तर आठ ठिकाणी एटीएम सुविधा कार्यान्वित आहेत. बँकेची ठेवी 522.26 कोटी रू. इतकी आहे. कर्जवितरण 300.94 कोटी आहे. भागभांडवल 21.73 कोटी असून आरक्षित ठेवी 35.78 कोटी एवढ्या आहेत. बँकेची गुंतवणूक 229.33 कोटी आहे. खेळते भांडवल 588.81 कोटी असून एकूण नफा 4.27 कोटी, तर निव्वळ नफा 2.33 कोटी इतका आहे.

लोकांचा या बँकेवर असलेला विश्वास आणि या बँकेकडून लोकांना मिळत असलेली चांंगली वागणूक व सेवा यामुळे या बँकेतील सर्व व्यवहार चोख चालतात. हाच विश्वास ग्राहक आणि भागधारकांनी या संचालक मंडळावर दाखवला आहे.
– प्रवीण झांट्ये, उपाध्यक्ष

सहकार खात्यातर्फे घालून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ही बँक चालत असून चांगल्या कामगिरीच्या जोरावर या बँकेला एफएसडब्लूएमतर्फे गेली सात वर्षे उत्कृष्ट श्रेणी मिळत आहे. बँकेतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे योगदान आहे.
– गुरुदत्त संझगिरी, अध्यक्ष

प्रत्येक कर्ज वितरणात सर्व तत्त्वे काटेकोरपणे पाळली जात असल्याने व कर्जांसंदर्भात संचालक मंडळातील एकाही संचालकाचा हस्तक्षेप नसल्याने या बँकेला कर्ज वसुलीत मोठी समस्या आली नाही.
– डॉ. शेखर साळकर, संचालक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!