डिचोली सेसा कामगारांनी घेतली सभापतींची भेट

Goan Varta Live | प्रतिनिधी
डिचोलीः डिचोलीतील सुमारे साडेतीनशे सेसा वेदांता कंपनी कामगारांना व्यवस्थापनाने गेल्या दोन महिन्यांपासून पगार अर्धाच ठेवल्याने कामगार वर्गावर आर्थिक संकट ओढवलं आहे. हातात केवळ दीड ते दोन हजारच येत असल्यानं संसाराचा गाडा हाकणं त्यांच्यासाठी कठीण बनलं आहे. या प्रश्नी त्वरित तोडगा काढून पूर्ण पगार देण्याची मागणी डिचोली कामगारांनी आज सभापती राजेश पाटणेकर यांना भेटून केली. तसंच त्या आशयाचं निवेदनही सादर केलं. यावेळी संघटनेचे निलेश कारबोटकर, किशोर लोकरे आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हेही वाचाः ब्रेकिंग! केंद्र सरकारचा #Twitterला शेवटचा इशारा
आम्ही कसं जगायचं?
या वेळी कामगारांनी सभापतींना त्यांच्या समस्या सांगितल्या. कंपनी विरुद्ध आमची तक्रार नाही. मात्र जे व्यवस्थापन करतात त्यांनी कामगारांना दिलासा देणं अपेक्षित आहे. आम्हाला अर्धा पगार मिळाला तर आम्ही कसं जगायचं? बँकांचं घेतलेलं कर्ज कसं फेडायचं? असे अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यामुळे कामगारांच्या मागण्यांचा तातडीने सोक्ष मोक्ष लावून कामगारांना दिलासा द्यावा, अशी विनंती या वेळी करण्यात आली. तसेच एका कामगाराची बदली केली असून कंपनीत बेकयदेशीर बाबी होत असल्याचं निवेदनात नमूद केलं.
हेही वाचाः डिचोली पालिका मंडळाची बैठक
खाण महामंडळ स्थापन करा
दरम्यान या कामगार संघटनेचे कायदा सल्लागार अजय प्रभुगावकर यांनी कंपनी कामगारांना वेठीस धरत असल्याचा आरोप केला. मध्यंतरी खनीज माल चालू होता त्यावेळी आम्ही प्रयत्न करून कामगारांना पूर्ण पगार देण्यास भाग पाडलं. आता खनिज वाहतूक बंद आहे आणि अर्धा पगार दिला जात असून हे अन्यायकारक आहे, असं प्रभुगावकर म्हणाले. सरकारने खाण महामंडळ प्रक्रिया तातडीने पूर्ण करून दिलासा द्यावा. प्रश्न झुलवत न ठेवता त्वरित कार्यवाही करून कामगारांना पूर्ण वेतन तसंच इतर सुविधा द्याव्यात. कामगारांना वेठीस धरण्याचे प्रकार त्वरित थांबवावेत असं सांगितलं.
हेही वाचाः आनंदवार्ता | मान्सूनचं आगमन, राज्यात ठिकठिकाणी रिमझिम सरी बरसायला सुरुवात
सभापतींचं आश्वासन
सभापती राजेश पाटणेकरांनी या प्रश्नी आपण चर्चा करून योग्य तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू, असं आश्वासन कामगारांना दिलं आहे.