राज्यपाल कोश्यारींनी गोव्यावरही थोडा भार टाकावा!

विमानाच्या विषयावरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा सल्ला

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रासह गोव्याचेही राज्यपाल असलेले भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) खासगी दौर्‍यासाठी महाराष्ट्र सरकारचेच विमान का वापरतात? ते गोव्याचेही राज्यपाल आहेत. मग ते गोवा सरकारकडे विमान उपलब्ध करून देण्यासाठी हट्ट का धरत नाहीत, असा सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला.

कोश्यारी यांच्या सरकारी विमान प्रवासाला महाराष्ट्र सरकारने परवानगी नाकारल्याच्या मुद्द्यावरुन राजकारण चांगलेच तापलेय. ठाकरे सरकार अहंकारीपणे वागत असल्याची टीका भाजपकडून जात असताना शिवसेना नेते संजय राऊतयांनी भाजपला प्रत्युत्तर दिले आहे. ‘राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे खासगी कामासाठी उत्तराखंडला जाणार होते. त्यामुळे नियमानुसार त्यांना सरकारी विमान नाकारण्यात आले. सरकारने राज्यघटनेतील नियमांचं पालन करणे, हा अहंकार आहे का?’ असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

कोश्यारींनी गोव्यावरही थोडा भार टाकावा

राज्यपाल कोश्यारी यांना उत्तराखंडसाठी सरकारी विमानाने प्रवास करण्याची परवानगी महाराष्ट्र सरकारच्या सामान्य विभाग प्रशासनाकडून नाकारण्यात आली. यामुळे कोश्यारी यांना ऐन वेळी विमानातून उतरावे लागले आणि खासगी विमानाची व्यवस्था झाल्यानंतर उत्तराखंडसाठी रवाना व्हावे लागले. या घटनेबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आले असता, त्यांनी राज्य सरकारच्या निर्णयाचे समर्थन केले. ‘राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालांचा आदर करतात. राज्य सरकारने सुडाच्या भावनेने किंवा राजकारण म्हणून भगतसिंह कोश्यारी यांना विमान नाकारलेले नाही. व्यक्तिगत कामासाठी सरकारी यंत्रणा वापरता येत नाही, हा नियमच आहे. उद्धव ठाकरे यांच्या जागी दुसरे कोणीही मुख्यमंत्री असते, तर त्यांनीही तसेच केले असते. भगतसिंह कोश्यारी हे गोव्याचेही राज्यपाल आहेत. त्यामुळे त्यांनी अधूनमधून गोवा सरकारचेही विमान वापरावे, थोडा भार त्यांच्यावरही टाकावा,’ असे संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांची जोरदार टीका

महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार हे आतापर्यंतचे सर्वांत अहंकारी सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. याबाबत संजय राऊत यांना विचारण्यात आले असता, त्यांनी फडणवीसांच्या विधानाची जोरदार खिल्ली उडवली. ‘अहंकार हा शब्द कोण कोणाला उद्देशून म्हणतेय पाहा. हे आश्चर्यच आहे. कोण-कोणास म्हणाले? असे प्रश्न आम्हाला शाळेत असायचे. या संपूर्ण प्रकरणात अहंकाराचा प्रश्न येतोच कुठे? कृषी कायद्यांसंदर्भात केंद्र सरकार ज्याप्रकारे वागतेय ते जर नियमात बसत असेल, तर केवळ राज्यापालांना विमान नाकारणे, हा अहंकार कसा काय असू शकतो?, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!