सावधान! हे तर धक्कादायक आणि भयानकच

टेस्टींग टाळणं जीवावर बेततंय

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्य सरकारच्या आरोग्य खात्याकडून जारी केल्या जाणाऱ्या हेल्थ बुलेटीनमध्ये अलिकडे नव्या पॉझिटीव्ह केसेसे कमी झाल्याचं आपल्याला दिसून येतंय. पण राज्याचा मृत्यूदर मात्र त्या तुलनेत कमी होताना दिसत नाहीए. जीएमसीत ऑक्सिजनची सोय झालीए. उपचारांसंबंधीही योग्य अंदाज आणि औषधंही उपलब्ध झालीत. तर मग मृत्यूदर का खाली येत नाही, असा प्रश्न सर्वांनाच पडून राहीलाय. या प्रश्नाचं प्रथमदर्शनी उत्तर म्हणजे अजूनही कोरोनाची लक्षणं असूनही लोक चाचणीसाठी जात नाहीत आणि अधिकाधिक वेळ घरीच राहुल आपल्या पद्धतीनं स्वेच्छेने उपचार करत असल्याची माहिती समोर आलीए. अगदी असहाय्य झाल्यानंतरच इस्पितळात धाव घेतली जाते आणि तिथे मग काहीच करणं शक्य होत नाही.

मांद्रे कोविड आयसोलेशन सेंटरचा प्रयोग धक्कादायक

मांद्रेचे मगोचे नेते जीत आरोलकर यांनी मतदारसंघातील लक्षणेविरहीत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांसाठी एका हॉटेलचं रूपांतर कोविड आयसोलेशन सेंटरमध्ये केलंय. या कामात त्यांना मांद्रे पंचायत तथा मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्त्यांनी साथ दिलीए. संपूर्ण पेडणे तालुक्यासाठी सरकारने सावळवाडा पेडणे येथे कोविड सेंटर सुरू केलंय जिथं जाणं लोकांना गैरसोयीचं ठरतंय. मांद्रेच्या या कोविड आयसोलेशन सेंटरमध्ये जीत आरोलकर यांच्या प्रयत्नांतून गुरूवारपासून अँण्टीजेन टेस्टींगची सोय करण्यात आलीए. गुरूवारी एकूण 40 जणांनी आपली चाचणी करून घेतली आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे यापैकी 7 जण पॉझिटीव्ह आढळून आले. दुसरी भयानक गोष्ट म्हणजे यात दोन लहान मुलांचा समावेश आहे. याचा अर्थ असा होतो की अजूनही गावांगावात लोक बारीक लक्षणे म्हणून टेस्टींगसाठी पुढे येत नसल्याचे निष्पन्न झालंय. अशा पद्धतीनं पॉझिटीव्ह रूग्ण टेस्टींगशिवायच घरी राहीले तर त्यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची शक्यता तर आहेच पण त्याचबरोबर घरी राहील्यामुळे तब्येत अचानक बिघडून ते जीवावर बेतण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो.

सरकारी टेस्टींगकडे लोकांची पाठ

मांद्रे मतदारसंघासाठी एकमेव तुये आरोग्य केंद्रात टेस्टींगची सोय आहे. अगदी केरी- तेरेखोल, पालये, हरमल, मांद्रे आदी गावांतील लोकांना तुयेत येऊन टेस्टींग करून घेणं खूप गैरसोयीचं ठरतंय. एककीडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही आणि टेस्टींगला जात असल्याचे म्हटल्यावर कुणीही आपल्या वाहनातून अशा लोकांना नेण्यास धजावत नाही. याचे परिणाम म्हणून हे लोक टेस्टींगसाठी जात नाही आणि त्याचे गंभीर परिणाम आढळून येताहेत. वास्तविक या सगळ्या गोष्टींकडे सरकारने गंभीरतेने पाहण्याची गरज होती. सरकारची मानसिकता याबाबतीत काहीच दिसत नसल्याने लोकांना मरण्यासाठीच सरकारने सोडलेय की काय, असा सवाल उपस्थित केला जातोय.

पंतप्रधान मोदींचं तरी ऐका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात वारंवार कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी व्यापक टेस्टींग तसंच पॉझिटीव्ह रूग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्याची गरज असल्याचं सांगितलंय. राज्यात भाजपचं सरकार असूनही पंतप्रधानांच्या संदेशाकडे दुर्लक्ष केलं जातंय. सरकारने अलिकडे कमी पॉझिटीव्ह प्रकरणं दाखवण्यासाठीच टेस्टींगचे प्रमाण कमी केलंय, असा आरोप केला जातोय. दुसरीकडे खाजगी प्रयोगशाळेतील टेस्टींगचे शुल्क गोव्यात इतर राज्यांच्या तुलनेत महाग असल्याने सर्वसामान्य लोकांना ते परवडणारे नाही. हे शुल्क कमी करण्याचीही सरकारची इच्छा शक्ती नाही. खरं तर सरकारने पंचायतस्तरावर टेस्टींगची सोय करून लक्षणे असलेल्या सर्वांना पुढे येऊन टेस्टींग करायला प्रोत्साहीत करण्याची गरज आहे. टेस्टींगकडे दुर्लक्ष करणं कधीही जीवावर बेतू शकत असल्याने सरकारने याचा गांभिर्याने विचार करावा, अशीही मागणी केली जात आहे.

पाया पडतो पण लोकांचे जीव वाचवा

आपण या सरकारकडे पाया पडतो पण लोकांचे जीव वाचवा, अशी विनवणी जीत आरोलकर यांनी केलीए. तूर्त राजकारण बाजूला सारा आणि लोकांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करा. मांद्रेचे आमदार कोरोनाच्या या काळात घरी बसून केवळ आढावा घेताहेत. गावांगावातील लोकांच्या आरोग्याची विचारपूस करण्याचं सोडून ते आपल्या कार्यकर्त्यांना खतं आणि बियाणी वाटताहेत. माणूस जगला तरच या खतांचा आणि बियाणांचा उपयोग होईल, असा टोला जीत आरोलकर यांनी हाणला. मांद्रे मतदारसंघात लोकांना टेस्टींगची सोय हवी, अशी मागणी होत असतानाही त्याकडे लक्ष दिलं जात नाही. दुसरी लाट थोपवली नसतानाच आमदार तिसऱ्या लाटेची तयारी करताहेत. दुसऱ्या लाटेतूनच पहिल्यांदा लोकांना वाचवा, असा सल्ला त्यांनी दिलाय.

इस्पितळापेक्षा मांद्रे आयसोलेशन सेंटरवर अधीक लोक

गुरूवारी तुये इस्पितळात टेस्टींगसाठी एकूण 52 लोक आले होते. यापैकी 20 लोकांनी आरटीपीसीआर टेस्टींग केली तर उर्वरीतांनी अँण्टीजेन टेस्टींग केली. तिथे 11 रूग्ण पॉझिटीव्ह सापडले. मांद्रेतील उदरगत संस्थेच्या आयसोलेशन सेंटरमध्ये 40 लोकांची अँण्टीजेन टेस्टींग झाली आणि तिथे 7 रूग्ण पॉझिटीव्ह सापडले. यावरून घरोघरी टेस्टींग करून लोकांचे प्राण वाचवणे गरजेचे आहे, असंच अधोरेखीत होतेय.

पंचायतींनी निर्णय घ्यावा

मांद्रेतील सर्व पंचायतींना उदरगत संस्थेच्यावतीने पत्र पाठविण्यात आलंय. पंचायतींची तयारी असेल तर आठवड्याचा एक दिवस मोफत अँण्टीजेन टेस्टींगची सोय करण्याची तयारी आपण दाखवली आहे. याबाबत पंचायतींना निर्णय घ्यायचा आहे. केवळ राजकीय मतभेद किंवा निष्ठेचा विचार करून यासंबंधीचा निर्णय घेतला जाऊ नये. पंचायतींना आपल्या टेस्टींगची गरज नसेल तर त्यांनी आमदारांच्या मदतीने किंवा सरकारच्या मदतीने मोफत टेस्टींगची सोय करावी आणि लोकांचे जीव वाचवण्यात मदत करावी, असं आवाहन जीत आरोलकर यांनी केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!