मृतदेहावर अंत्यसंस्कार नाकारल्याने बस्तोड्यात वाद

Goan Varta Live | प्रतिनिधी
म्हापसाः भिरमोटे बस्तोडा येथील एका युवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. पण मयताच्या पार्थिवाचे बस्तोडा स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यास स्मशानभूमी समितीने नकार दिला. या प्रकारावर हिंदुसह इतर समाजातील लोकांनी संताप व्यक्त केला आहे.
हे पहाः Photo Story | Curfew Day 01 | संचारबंदीचा पहिला दिवस | सगळीकडे सामसूम
म्हापसा स्मशानभूमीत केले अंत्यसंस्कार
या युवकाच्या पार्थिवावर म्हापसा पालिकेच्या सहकार्याने शेवटी म्हापशातील वैकुंठधाम स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. म्हापसा पालिकेचे कामगार अशोक नाईक यांचं शनिवारी कोरोनामुळे निधन झालं. सर्व सोपस्करानुसार गोमेकॉतून त्यांचा मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आला. गावात मृतदेह आणताच स्मशानभूमी समितीने अंत्यविधीला परवागी नाकारली. त्यामुळे नाईक कुटुंबीय आणि त्यांच्या मित्र परिवाराने नाराजी व्यक्त केली. समितीची समजूत काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. त्यामुळे म्हापसा स्मशानभूमीत नेऊन अखेर मयतावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचाः नव्या रुग्णांपेक्षा कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांची संख्या रविवारी जास्त, पण….
दुर्दैवी प्रकार
या प्रकाराबद्दल आंतररष्ट्रीय हिंदु महासभा संघटनेचे गोवा अध्यक्ष विनायक नानोस्कर यांनी तीव्रसंताप व्यक्त केला. करोनामुळे अनेक लोकांचा बळी जात आहे. यावेळी प्रत्येकाने माणुसकी जपली पाहिजे. पण बस्तोडातील स्मशानभूमीच्या समितीने गावच्याच इसमावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिल्याचा प्रकार दुदैवी आहे, असं ते म्हणाले.
हेही वाचाः लस न घेतलेल्या लोकांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त
…तर गावात स्मशानभूमीच कशाला हवी?
स्थानिक रहिवाशाला जर गावात अंत्यविधीसाठी परवानगी मिळत नाही, तर गावात स्मशानभूमीच कशाला हवी. कोरोनाग्रस्ताचं पार्थिव जाळल्यास स्थानिकांना करोना कसा होता. यावरून हिंदू समाजातील दुफळी उघडकीस येते. असं सांगून स्थानिक पंचायत व राजकारण्यांच्या समाजसेवेवरदेखील नानोस्करांनी सवाल उपस्थित केला.
हेही वाचाः गोवा हद्दीलगतच्या ‘या’ चेकपोस्ट वर सुरु आहे आरोग्य तपासणी
माणुसकीला काळीमा फासणारी घटना
मयत व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला नाकारणं, यापेक्षा दुसरी दुर्दैवी घटना नाही, या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी दखल घ्यावी व संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नानोस्कर यांनी केली. मयताचे नातेवाईक आणि मित्र परिवाराने यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी आहे. बस्तोडावासियांसाठी विशेषतः कोरोनामुळे मरण येणार्यांना गावात वेगळी स्मशानभूमी उभारून द्यावी, अशी मागणी या लोकांनी मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्याकडे केली आहे. शिवाय बस्तोडा पंचायतीलादेखील या प्रकाराबद्दल कारणीभूत धरण्यात आलं.
हेही वाचाः आता तरी मुख्यमंत्री शब्द पाळतील ?
सोमवारी पंचायत मंडळ, स्मशानभूमी समितीची बैठक
बस्तोडातील स्मशानभूमी पंचायतीच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. त्यामुळे या घटनेमुळे पंचायतीला दोष देणं चुकीचं आहे. माणुसकीच्या नावाने अशावेळी अंत्यविधी करायला देणं आवश्यक आहे. यासंदर्भात उद्या सोमवारी पंचायत मंडळ व स्मशानभूमी समितीची बैठक बोलावली आहे. असा प्रकार घडू नये, अशी विनंती आम्ही समितीजवळ करणार आहोत, असं सरपंच रणजित उसगांवकर यांनी सांगितलं.