मुंबईला निघालेली गोव्याची दारू बांदा इथं पकडली

दोन संशयितांना अटक ; दारुसह ४५ लाख ७६ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

Goan Varta Live | प्रतिनिधी

बांदा : गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची इन्सुली नाका येथे तपासणी करत असताना गोवा दारुसह ४५ लाख ७६ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत गोवा निर्मित मद्यवाहतूक करताना बडोदा गुजरात व घाटकोपर मुंबई येथील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले.

कोव्हीड-19 लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात चोरटी वाहतूक होत असल्याची खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली होती. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील इन्सुली तपासणी नाका येथे सदर अवैध दारू वाहतूक करणारा आयशर टेम्पो संशयितरीत्या येत असल्याचे दिसून आले. टेम्पो तपासणीसाठी थांबविण्यात आला असता वाहनामधील प्लास्टिक ड्रममध्ये व कागदी पुठ्ठय़ाच्या बॉक्समध्ये दारूचे बॉक्स लपवून ठेवण्यात आले होते.

या कारवाईत गोवा निर्मित मद्यवाहतूक करताना बडोदा गुजरात व घाटकोपर मुंबई येथील दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. सदर कारवाई सिंधुदुर्ग राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक डॉ बी. एच. तडवी यांच्या उपस्थितीत करण्यात आली. शैलेंद्र चव्हाण, शिवाजी काळे, रमेश चंदूरे, शरद साळुंखे, शिवशंकर मुपडे, अमित पाडळकर व विशेष पथकाचे दुय्यम निरीक्षक ए एम चव्हाण व बापूसाहेब डोणे, आर एच पाटील यांनी कारवाई केली. पुढील तपास प्रभारी निरीक्षक शैलेंद्र चव्हाण करीत आहेत .

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!