बाणावली वेस्टर्न बायपास प्रकरणः राष्ट्रीय हरित लवादाने केलेल्या सूचनांमुळे या लढ्याला यश

कोरिया दिकॉस्ता यांची प्रतिक्रिया; राज्य सरकारला पाहणीअंती अहवाल देण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाकडून सूचन

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: बाणावलीत येऊ घातलेल्या वेस्टर्न बायपासच्या रस्त्यामुळे येथील पर्यावरणाला धोका निर्माण होणार आहे. येथे उभारण्यात येणारा पूल हा स्टिल्टवर उभारण्यात यावा अशी मागणी २०१९ साली बालदिनी करण्यात आली होती. राज्य सरकारकडून आमची मागणी पूर्ण करण्यात आलेली नसली, तरी राष्ट्रीय हरित लवादाने पाहणीअंती अहवाल देण्याच्या केलेल्या सूचनांमुळे या लढ्याला यश आलं असल्याची प्रतिक्रिया कोरिया दिकॉस्ता या मुलीने व्यक्त केली.

बाणावली वॉरिअर्सकडून आनंद व्यक्त

राष्ट्रीय हरित लवादाने वेस्टर्न बायपासच्या प्रश्नावरून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणीवेळी दहा सदस्यीय समिती स्थापन करून बाणावलीतील पर्यावरणीय स्थितीचा आढावा घेत वेस्टर्न बायपासमुळे होणारी हानी कमी करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या याबाबतचा अहवाल तीन महिन्यांत देण्याच्या सूचना केलेल्या आहेत. यामुळे गुरुवारी बाणावली वॉरिअर्स या पर्यावरणप्रेमींसह मुलांनी खारेबांधनजीक एकत्र येत आनंद व्यक्त केला.

दहा सदस्यीय समितीला पाहणी करून अहवाल देण्याच्या सूचना

यावेळी याचिकाकर्त्या रॉयला फर्नांडिस यांनी सांगितलं की, १४ नोव्हेंबर २०१९ रोजी खारेबांध येथील तळ्यानजीक बाणावलीतील मुलांच्या पालकांनी पुढाकार घेत बालदिन साजरा करण्यात आला होता. यावेळी बाणावलीतील जैवविविधता वाचवण्यासाठी वेस्टर्न बायपासवरील पूल हा स्टिल्टचा बनवण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावेळीपासून राज्य सरकारच्या जलसंपदा, बांधकाम खाते, कृषी खाते, पर्यावरण बदल खाते अशा विविध खात्याकडे स्टिल्ट पुलाची मागणी करत निवेदन सादर केलं होतं. तेव्हा अनेक बैठका झाल्या, चर्चा झाली मात्र, नागरिकांची मागणी पूर्ण झाली नाही. यावर्षी केवळ तीन दिवसांच्या पावसात वेस्टर्न बायपास येणार्‍या भागात पाणी भरल्याचं दिसून आलं. राज्य सरकार लोकांचं म्हणणं ऐकून घेण्यास तयार नसल्यानं राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेनुसार राष्ट्रीय हरित लवादाने दहा सदस्यीय समितीकडून पाहणी करण्यास आणि अहवाल देण्यास सांगितल्यानं लोकांच्या, मुलांच्या लढ्याला यश आलं आहे, असे पर्यावरणप्रेमी रॉयला फर्नांडिस यांनी सांगितलं.

ही लढाई केवळ आतासाठी नाही तर भविष्यासाठी आहे

अ‍ॅड. ब्रायन रॉड्रिग्ज म्हणाले, लोकांचं म्हणणं ऐकून घेणं राज्य सरकारचं कर्तव्य आहे. रेनबो वॉरिअर्स यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने मत व्यक्त करताना पाणी भरणार्‍या परिसरात त्या सेटलमेंट झोनमध्ये असतील तरी त्याठिकाणी काहीही बांधकाम करण्यास मनाई केली आहे. ही लढाई केवळ आतासाठी नाही तर भविष्यासाठी आहे, पर्यावरण बचावासाठी आहे. त्यामुळे अशा घटनांकडे गांभीर्यानेच पाहणं गरजेचं असल्याचं अ‍ॅड. रॉड्रिग्ज म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!