२० प्रकाराचे मासे पकडण्यावर बंदी?

माशांच्या पैदासीवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून सरकाराने 20 प्रकाराचे मासे पकडण्यावर बंदी घातलीये.

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजी : गोव्याची खाद्यसंस्कृती पोर्तुगीज, स्थानिक हिंदू अशा दोन वेगवेगळ्या संस्कृतींचं अनेक शतकांपासून बनलेलं एक वेगळंच, पण अत्यंत सुंदर असं मिश्रण आहे. जरी इथे हिंदू आणि ख्रिश्चन धर्माच्या प्रभावानं दोन तऱ्हेच्या खाद्यसंस्कृती आहेत, त्यांच्यात बरीच साम्य आहेत आणि ह्या दोन्ही पद्धतींचा कुठे ना कुठे मिलाफ होतो आणि हे खाद्यसंस्कृतीचं मिश्रण गोव्याच्या जेवणाला विशेष बनवतं. मासळी आणि गोमंतकीय यांचं असं एक समीकरण जुळलेलं आहे. मासळी नसेल तर गोमंतकीयांच्या घशाखाली घास उतरत नाही. ताटात मासळी नसेल तर जेवणालाही काही अर्थ राहत नाही. मासे खवय्ये, अशी गोमंतकीयांची ओळख. याच माशांच्या पैदासीवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय.

काय घेतलाय निर्णय?

माशांच्या पैदासीवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून सरकाराने 20 प्रकाराच्या लहान आकाराचे मासे पकडण्यावर बंदी घातलीये. या विषयीची अधिसूचना मच्छिमार खात्याने जारी केलीये. माशांच्या आकाराप्रमाणे ते पकडण्यावर बंदी निश्चीत केलीये.

बंदी घालण्याचं कारण?

माशांच्या प्रजातींची काळजी घेण्यासाठी आणि भविष्यात त्यांचं उत्पादन वाढावं म्हणून ही बंदी घातली असल्याची माहिती मच्छिमार खात्याच्या संचालक शमिला मोंतेरो यांनी दिलीये. बंदीच्या कार्यवाहीसाठी मासे धरण्याच्या जाळांच्या आकारावरसुद्धा निर्बंध येतील, असंही त्यांनी सांगितलंय.

या माशांवर आणलीये बंदी…

गोवा, दमण, दीव मच्छिमार नियमन कायदा १९८०च्या कलम ४ आणि उपकलम २ अंतर्गत खात्याने ही अधिसूचना जारी केलीये.
ताल्ल्यो (10 टीएल), बांगडो (14 टीएल), बाळो (46 टीएल), इस्वण (50 एफएल), मोतयाळें (7 टीएल), सुरंगुटी (17 टीएल), बुगडो (31 एफएल), मुड्डोशी (11.3 टीएल), वेल्ली (8.9 टीएल), राणें (12 टीएल), सवनाळें (10 टीएल), लेपो (9 टीएल), पापलेट (13 टीएल), गोबरो (18 टीएल), दोडयारो (15 टीएल), दोडयारो, क्रोएकर (17 टीएल), माणक्यो (8 डीएमएल), कुल्ली (7 सीडब्लू), सुंगट (7 टीएल), सुंगटा, शिम्प (9 टीएल) हे मासे पकडण्यावर त्यांच्या आकाराप्रमाणे बंदी घालण्यात आलीये. टीएल म्हणजे टोटल लेंन्थ, एफएल म्हणजे फॉर्क लेन्थ, डीएमएल म्हणजे डोर्सल मेंटल लेन्थ, सीडब्लू म्हणजे कॅरापेस विड्थ असं अधिसुचनेत स्पष्ट केलंय.

मच्छिमार संचालक शमिला मोंतेरो म्हणाल्यात…

भविष्यात जर आपल्याला मासे हवे असतील, तर आज आपण त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. आज आपण बेसावधपणे मासे पकडत राहिलो तर गोव्यात मिळणार्या काही खास माशांच्या प्रजाती भविष्यात नाहीशा होतील. आपल्या पुढच्या पिढीला त्या फक्त पुस्तकात पहायला मिळतील. त्या सर्व प्रजातींचं रक्षण करणं ही काळाची गरज आहे. म्हणून हे लहान मासे पकडण्यावर बंदी घातली गेलीये. जाळ्यांच्या आकारावरदेखील निर्बंध येतील आणि याची कार्यवाही होईल.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!