अपहरण व खंडणी प्रकरणातील 5 जणांचा जामीन फेटाळला

वास्को पोलिसांनी 12 जणाच्या टोळीला केलं होतं गजाआड

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कॅनडाला नोकरीसाठी पाठवण्याच्या बहाण्याने तरुणांची आर्थिक फसवणूक व अपहरण करून त्यांच्याकडून खंडणी मागणाऱ्या टोळीतील १२ जणांना वास्को पोलिसांनी अटक केली होती. यातील आलेक्स रिचर्डसन डिसोझा, रॉबिन्सन डिसोझा, संजू सिंग, अनुराग कुमार आणि विशाल गोस्वामी या पाच जणांचा जामीन अर्ज मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

अफगाणी नागरिक शपूर शरीफी याचे अपहरण केल्याप्रकरणी १२ फेब्रुवारी २०२१ रोजी वास्को पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर वास्को पोलिसांनी पर्वरी येथील एका बंगल्यावर छापा टाकून शरिफी याची सुटका केली होती. या प्रकरणी वास्को पोलिसांनी संशयित सुशील सिंग उर्फ ऋषभ (३५, हरयाणा), आलेक्स रिचर्डसन डिसोझा (२९, पेडणे), रॉबिन्सन डिसोझा (२३, पेडणे), आशिष त्रिपाठी (३०, गोरखपूर-उत्तर प्रदेश), रजत कल्याण (२३, हरयाणा), साहील कल्याण (२४, हरयाणा), प्रदीप कुमार (३२, हरयाणा), संजू सिंग (२८, हरयाणा), विजय (२६, हरयाणा), अनिल कुमार (३६, हरयाणा), अनुराग कुमार (१८, हरयाणा) व विशाल गोस्वामी (२०, हरयाणा) या बारा संशयितासह एका अल्पवयीन मुलाविरोधात भादंसंच्या कलम ३६४ (ए), ३४२ आणि ३६५ नुसार गुन्हा दाखल करून १२ जणांना अटक केली होती. शरिफी बरोबर पोलिसांनी पंजाब येथील करमनप्रित सिंग या युवकाची सुटका करून त्याला पर्वरी पोलिसाच्या स्वाधीन केले होते. त्या प्रकरणी पर्वरी पोलिस स्थानकात टोळी विरोधात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गुन्ह्याप्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, वरील टोळीतील संशयित आलेक्स रिचर्डसन डिसोझा, रॉबिन्सन डिसोझा, संजू सिंग, अनुराग कुमार आणि विशाल गोस्वामी या पाच जणांनी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तो सोमवारी फेटाळून लावला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!