तान्हुल्याच्या अपहरणाने खळबळ; गोमेकॉच्या आवारातील घटना

एका महिन्याचे बाळ पळवले; अनोळखी महिलेविरुद्ध अपहरणाचा गुन्हा

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजीः बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय परिसरातून दिवसाढवळ्या एका महिन्याच्या अर्भकाचं अपहरण करण्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या प्रकरणी पीडित मातेच्या तक्रारीवरून उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक रात्री उशीरापर्यंत म्हापसा परिसरात संशयित महिलेचा शोध घेत होते.

हेही वाचाः उपमुख्यमंत्र्यांवर केलेले आरोप तथ्यहीन

३० ते ३५ वयोगटातील महिलेने केलं अपहरण

अर्भकाचं अपहरण झाल्यानंतर मातेने आगशी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. एका ३० ते ३५ वयोगटातील महिलेने अर्भकाचे अपहरण केल्याचं तिने तक्रारीत म्हटलं आहे. याची दखल घेऊन आगशी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हेही वाचाः आंतरमंत्रालयीन पथकाची बैठक; तौक्ते चक्रीवादळातील नुकसानीचा घेतला आढावा

अपहरणकर्ती महिला म्हापसातून पुढे गेल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

संशयित महिलेने शुक्रवारी दुपारी गोमेकॉ परिसरात मातेच्या हातातून अर्भकाला खेचून घेतलं असता मातेने आरडाओरडा सुरू केला. मात्र, त्या महिलेने अतिशय चलाखीने तिथून पळ काढला. आजूबाजूच्या लोकांनी तिचा शोध सुरू केला असता, ती मोटारसायकल पायलट करून पणजी बसस्थानकावर गेल्याची माहिती समोर आली. पुढे तपास केला असता ती महिला दुसऱ्यामोटारसायकल पायलटच्या मदतीने पर्वरीतील ‘तीन बिल्डींग’ या ठिकाणी गेल्याचं समजलं. तिथून पुढे कांसा थिवी येथे गेल्याची माहिती मिळताच त्या ठिकाणी पोलिसांनी दोन तास शोधा घेतला. पण ती पर्वरीतूनच ‘जनता बस’मधून म्हापशाला गेल्याचं स्पष्ट झालं. त्या बसमधून ती श्री महारुद्र देवस्थानाजवळ उतरून पुढे निघून गेल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसून आलं.

पोलिसांचा तपास सुरू

उपलब्ध माहितीनुसार अधीक्षक सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक गजानन प्रभूदेसाई, संतोष देसाई, संदेश चोडणकर तसंच निरीक्षक तुषार लोटलीकर, महेश गडेकर, सुदेश नाईक, विजय राणे सरदेसाई, गुन्हा शाखेचे निरीक्षक नारायण चिमुलकर, लक्ष्मी आमोणकर व उत्तर गोव्यातील इतर अधिकारी पोलीस पथकासह संशयित महिलेचा रात्री उशीरा शोध घेत होते. दरम्यान, या प्रकरणी स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर जागृती करून संशयित महिलेला पकडण्याचा प्रयत्न सुरू केला होता.

हेही वाचाः १८ जून रोजी राज्यात गोवा क्रांती दिवस समारंभ

अपहरणाच्या घटनेशी गोमेकॉचा काहीही संबंध नाही

दरम्यान विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी ट्विट करून या घटनेचा निषेध केला आणि ही सुरक्षिततेची त्रुटी असल्याचा दावा केला होता. कामतांच्या ट्विटवर रिट्विट करत आरोग्यमंत्री विश्वजित राणेंनी या अपहरणाच्या घटनेशी गोमेकॉचा काहीही संबंध नसल्याचं म्हटलंय. ट्विट करताना आरोग्यमंत्री म्हणालेत, जीएमसीमध्ये नोंदवलेल्या अपहरणाच्या घटनेची चुकीची नोंद करण्यात आली आहे. अपहरण करण्यात आलेलं मूल जीएमसीचा रुग्ण नव्हतं किंवा त्याचा सुरक्षिततेशी जीएमसीसा काही संबंध नाही. हा एक निराधार आरोप आहे आणि घटनेची वस्तुस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!