पणजी महापालिकेत घराणेशाही?

रोहित मोन्सेरात महापौर होण्याच्या वृत्तानं चर्चेला उधाण

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात (Babush Monserrate) यांचा पुत्र रोहित मोन्सेरात पणजी महापालिकेचा (Corporation of the City of Panaji CCP) महापौर होणार अशी बातमी आली आणि राजधानीत चर्चांना उधाण आलं. वडील पणजीचे आमदार, आई महसूलमंत्री आणि पुत्र पणजीचा महापौर अशी घराणेशाहीची नवी ओळख मोन्सेरात कुटुंबामुळे गोमंतकीयांना होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.

नगरसेवकांनीच नाव सुचवलं?

भाजप समर्थक पॅनलची सत्ता आल्यानंतर पणजी महापालिकेत महापौर कोण होणार हा प्रश्न उपस्थित झाला. त्याबद्दल बाबूश मोन्सेरात यांनी कानावर हात ठेवताना योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल आणि पॅनलचे विजयी उमेदवार महापौर ठरवतील, अशी मखलाशी केली होती. त्याचबरोबर रोहित यांच्या महापौर होण्याबाबतही उत्तर देण्याचं त्यांनी टाळलं होतं. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबूशपुत्र रोहित याचं नाव महापौरपदासाठी आघाडीवर आहे. काही नवनिर्वाचित नगरसेवकांनीच बाबूश यांना रोहितला महापौर बनवा, अशी गळ घातल्याची माहिती मिळालीय.

फॉर्म नेल्यानं शिक्कामोर्तब

महापौर आणि उपमहापौरपदी निवड होण्यासाठी नामांकन अर्ज सादर करावा लागतो. रोहित मोन्सेरात यांच्या नावे महापौरपदाच्या नामांकनासाठी आणि बेंतो लॉरेना यांच्या नावाने उपमहापौरपदासाठी महापालिकेतून नामांकन अर्ज नेण्यात आल्यानं याच दोघांची या पदांसाठी निवड झाल्याची चर्चा आहे. मात्र या वृत्ताला भाजप नेते किंवा बाबूश मोन्सेरात यांच्याकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. काही भाजप नगरसेवकांना संपर्क केला असता, या संदर्भात तेही अंधारात असल्याची माहिती मिळाली.

घराणेशाहीमुळे विरोध?

बाबूश मोन्सेरात यांची राजकीय महत्त्वाकांक्षा सर्वांना परिचित आहे. काँग्रेसमधून 10 आमदार फोडून भाजपात प्रवेश करण्याच्या राजकीय चालीचे मास्टरमाईंड बाबूशच असल्याचं नंतरच्या काळात स्पष्ट झालं. त्यांची पत्नी जेनफिर मोन्सेरात (Jennifer Monserrate) यांना महसूलमंत्रीपद मिळवून देण्यात बाबूश यांचीच मोठी भूमिका होती. स्वत: पडद्यामागे राहून सत्तेची फळं चाखण्याची बाबूश यांची राजकीय चलाखी पहाता, काही विश्वासू नगरसेवकांना पुढे काढून रोहित यांना महापौरपद मिळवून देण्याची चाल ते खेळत आहेत, हे आता लपून राहिलेले नाही. मात्र काही पारंपरिक भाजप कार्यकर्ते बाबूश पॅनलमधून नगरसेवक म्हणून निवडून आल्यानं या घराणेशाहीला विरोध होऊ शकतो.

रोहितऐवजी कोणाची वर्णी?

अंतर्गत विरोधाला बाबूश कवडीचीही किंमत देत नसल्याचं पॅनल जाहीर करतानाच बघायला मिळालं. त्यामुळे रोहित यांच्या नावाला विरोध झालाच, तर ह विरोध ते कितपत मनावर घेतील, हाही प्रश्न आहे. मात्र बाबूश यांनी या विरोधी मताचा आदर ठेवून महापौरपदासाठी वेगळ्या नावाचा विचार केला, तर यात कोण बाजी मारेल, याचेही ठोकताळे बांधणं कठीण आहे. कारण धक्कातंत्रासाठी बाबूश ओळखले जातात. तरीही माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक शुभम चोडणकर, माजी उपमहापौर कॅरोलिना पो, मावळते महापौर उदय मडकईकर यांची महापौरपदी वर्णी लागू शकते. रोहित महापौर झाला, तर उपमहापौरपदासाठी बेंतो लॉरेना यांचं नाव मागे पडण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही पदं कॅथलिक नगरसेवकांना देण्याचा निर्णय बाबूश घेतील, असं वाटत नाही. त्यामुळे एकूणच पणजीची महापौर-उपमहापौरपदाची निवडणूक यावेळी रंगतदार झाली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!