गोव्यात मराठी चॅनलची उणीव भरून निघेल : बाबू कवळेकर

गोवन वार्ता लाईव्हचं दिमाखात लोकार्पण

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी

पणजी : गोव्यात मराठी चॅनलची उणीव होती. गोवन वार्ता लाईव्हच्या रुपाने ही उणीव भरून निघेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर यांनी व्यक्त केला.
गोवन वार्ता लाईव्ह या गोव्यातील पहिल्या मराठी महाचॅनलच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. शुक्रवारी, धनत्रयोदशीला हा वैभवशाली सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत ताज हॉटेल अँड कन्वेन्शन सेंटर, दोनापावला इथं पार पडला.

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर, फोमेन्तो मीडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर अंबर तिंबलो, महाराष्ट्राचे माहिती आणि जनसंपर्क महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, गोवन वार्ताचे संपादक संजय ढवळीकर आणि गोवन वार्ता लाईव्हचे संपादक किशोर नाईक गावकर व्यासपिठावर उपस्थित होते.

गोमंतकीयांना मराठीची आणखी गोडी लागेल…

फोमेन्तो मीडियाच्या नव्या उपक्रमाला शुभेच्छा देताना कवळेकर म्हणाले, गोव्यात वाचनासाठी बहुतेक लोक मराठीला पसंती देतात. आता गोवन वार्ता लाईव्हच्या रुपाने नवा मराठी चॅनल गोमंतकीयांच्या सेवेसाठी सज्ज होत आहे. त्यामुळे येणार्‍या काळात गोमंतकीयांना मराठीची आणखी गोडी लागेल. गोव्यात मराठी चॅनल येणं अत्यंत गरजेचं होतं. गोमंतकीय बोलतात कोकणी, पण वाचतात मराठीत. ज्यांना मराठी सहजपणे बोलता येत नाही, त्यांना गोवन वार्ता लाईव्हमुळे मराठी बोलण्याचा सराव नक्की होईल. गोवा आणि महाराष्ट्राचे संबंध आधीपासून सलोख्याचे आहेत. गोवन वार्ता लाईव्हमुळे ते आणखी वृद्धिंगत होतील.

हेही वाचा

गोव्याच्या माध्यम क्षेत्रात मराठी महाचॅनलची मुहूर्तमेढ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!