बाबू कवळेकरांचा नवा आदर्श

वाढदिनी कोविड केअर सेंटरचे लोकार्पण

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजीः राज्यात कोविड संसर्गाची लाट पसरली असतानाही आपल्या राजकीय ताकदीचं प्रदर्शन मांडणारी वृती एकीकडे, तर दुसरीकडे वास्तवाचं भान ठेवून आणि आपल्या जनतेच्या सुरक्षेचा विचार करून केपेच्या लोकांसाठी स्वतंत्र कोविड केअर सेंटर खुलं करून आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा नवा आदर्श केपेचे आमदार तथा उपमुख्यमंत्री चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर यांनी घालून दिलाय.

भाजपची ताकद वाढली, तर काँग्रेसला मोठा फटका

केपे तालुक्यासहीत काणकोण, सांगे आदी भागांतही बाबू कवळेकर यांची चांगली लोकप्रियता आहे. लोकनेता म्हणून त्यांना मान्यता मिळालीए. काँग्रेसमधून भाजपात दाखल झाल्यानंतर सर्वाधिक भाजपला फायदा झालेले बाबू कवळेकर हे ठरले आहेत. जिल्हा पंचायत, नगरपालिका निवडणूकीत एकहाती सत्ता स्थापन करून बाबू कवळेकर यांनी भाजपला यश मिळवून दिलेए. बाबू कवळेकर यांचं विशेषपण म्हणजे त्यांचा लोकसंपर्क. नेहमीच मदतीचा हात पुढे करण्यात त्यांचा हातखंडा आहे आणि त्यामुळे या परिसरात त्यांना लोक खूप मानतात. केपेतून बाबू कवळेकर यांना परावृत्त करण्याचे भाजपचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले होते. आता हेच बाबू कवळेकर भाजपात दाखल झाल्यामुळे भाजपची ताकद वाढलीए तर काँग्रेसला त्याचा मोठा फटका बसलाय.

केपेकरांना दिलासा

केपेच्या जनतेला आरोग्याच्या आपत्कालीन परिस्थितीत मडगाव धाव घेणं भाग पडतं. या कोविडच्या काळात केपेकरांची मोठी गैरसोय सुरू आहे. हे ओळखून बाबू कवळेकर यांनी सरकारची परवानगी घेऊन केपे सरकारी महाविद्यालयात कोविड केअर सेंटर सुरू करण्याची मान्यता मिळवली. याठिकाणी 50 खाटांची व्यवस्था केलीए तसंच त्यात ऑक्सिजन खाटांचीही व्यवस्था केलीए. स्वतः पुढाकार घेऊन त्यांनी हे साध्य केलंय. प्रत्येक गोष्टीसाठी सरकारकडे टक लावून बसण्यापेक्षा आपण स्वतः पुढाकार घेतला तरच काही गोष्टी साध्य होऊ शकतात हे बाबू कवळेकर यांनी दाखवून दिलंय. जिथं काही कमी पडतं ते सांगा आपण देऊ, असा विश्वास त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांना दिल्यानं त्यांनीही जोमाने काम सुरू करून अखेर हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात महत्त्वाची भूमिका वठवली आहे.

लोकांच्या सेवेसाठी

वाढदिवस हा आनंदाचा क्षण असतो. परंतु आपली जनता संकटात असताना आणि जीवाशी झुंज देत असताना वाढदिवस साजरा करणे हे मुर्खपणाचे ठरेल. आपण या वाढदिवसानिमित्त लोकांच्या सेवेसाठी काम करणार आहे. आता यापुढे जोपर्यंत कोविडचे संकट दूर होत नाही तोपर्यंत जनसेवेसाठी पूर्णपणे कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!