संतोष, रवींकडून आज मंत्र्यांची वैयक्तिक शाळा!

संघटनात्मक बांधणीचा घेणार आढावा; प्रत्येक मंत्र्याला बैठकीसाठी दिला वेळ

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष आणि गोवा प्रभारी सी. टी. रवी बुधवारी संध्याकाळी राज्यात दाखल झाले. गुरुवारी सकाळी ८ पासून हे दोन्ही नेते मंत्री, भाजप आमदारांशी चर्चा करून संघटनात्मक बांधणीचा आढावा घेणार आहेत.

हेही वाचाः बारावीच्या निकालाची गुणपद्धत कशी असावी?

पणजीत सर्वच मंत्र्यांशी वैयक्तिकरीत्या बैठक घेणार

राज्य विधानसभा निवडणूक अवघ्या आठ महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे भाजपने निवडणुकीची तयारी दिल्लीपासूनच सुरू केली आहे. त्याअनुषंगाने पक्षाने संतोष आणि सी. टी. रवी यांना दोन दिवसीय गोवा दौऱ्यावर पाठवलं आहे. बुधवारी सकाळी ८ पासून हे दोन्ही नेते पणजीत सर्वच मंत्र्यांशी वैयक्तिकरीत्या बैठक घेणार आहेत. बैठकीसाठी प्रत्येक मंत्र्याला बुधवारीच वेळ देण्यात आला आहे. ज्याची कामगिरी चांगली त्याला कमी आणि कामगिरी खराब त्या मंत्र्याला बैठकीसाठी अधिक वेळ देण्यात आल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.

हेही वाचाः करोना काळात रजेबाबत सरकारी कर्मचाऱ्यांना दिलासा

बैठकांत सखोल चर्चा

राज्यात सध्या भाजपविरोधात सर्व पक्ष अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेस, मगो, गोवा फॉरवर्ड तसेच इतर काही पक्ष संघटित होत आहेत. त्यात करोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सरकारकडून झालेल्या चुका, गैरकारभारामुळे भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेतही निराशा पसरलेली आहे. पक्षाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांत पसरलेली निराशा दूर करून त्यांना एकत्र आणण्याबाबत बुधवारच्या बैठकांत सखोल चर्चा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितलं.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात आतापर्यंतच्या सर्वाधिक दैनंदिन मृत्यूंची नोंद

अशा मंत्र्यांचा संतोष आणि रवी यांच्याकडून समाचार

गेल्या काही दिवसांत काही मंत्र्यांनी अनेकवेळा स्वत:चं सरकार आणि पक्षाला घरचा अहेर दिला आहे. त्यांच्या वक्तव्यांची माहिती प्रदेश भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी अगोदरच केंद्रीय नेतृत्वाला दिलेली आहे. त्यामुळे अशा मंत्र्यांचा संतोष आणि रवी यांच्याकडून समाचार घेतला जाणार असल्याचं समजतं.

हेही वाचाः ‘सिंधुदुर्गचे आपणच कैवारी’ अशा फुशारक्या मारणाऱ्या राजकारण्यांचं पितळ उघडं !

उमेदवारांची चाचपणी करण्यास भाजपकडून सुरुवात

बुधवारच्या बैठकांपासून विधानसभा निवडणुकीसाठीच्या भाजप उमेदवारांची छाननी प्रक्रिया सुरू होणार आहे. ज्या भागातील भाजप आमदाराने चांगली कामगिरी बजावलेली नाही, त्या भागात इतर उमेदवारांची चाचपणी करण्यासही भाजपने सुरुवात केली आहे, अशीही माहिती सूत्रांकडून मिळते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!