आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन

आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यात तब्बल 5 दशकांचं योगदान

Goan Varta Live | प्रतिनिधी

पुणे : आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन झालं आहे. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल, संजय आणि सूना व नातवंडे असा परिवार आहे.

बालाजी तांबे हे आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ तसेच पुणे जिल्ह्यातील कार्ला येथे असलेल्या आत्मसंतुलन व्हिलेजचे संस्थापक होते. तब्बल पाच दशकं त्यांनी आयुर्वेद, अध्यात्म आणि संगीतोपचार यांचा प्रचार व प्रसार केला. समाजातील अनेक घटकांना त्यांनी आयुर्वेदाशी जोडले. आयुर्वेद केवळ राज्य किंवा देशभरापुरतं मर्यादित न ठेवता त्यांनी जगभरात प्रसार केला आणि त्याचं महत्व पटवून दिलं.

बालाजी तांबे यांना लहानपणापासूनच वडिलांकडून आयुर्वेदाची शिकवण मिळाली होती. आयुर्वेदातली आणि अभियांत्रिकीमधली पदवी त्यांनी एकाच वर्षी मिळवली होती. त्यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केलं होतं. त्यांच्या गर्भसंस्कारावरील पुस्तकांना मोठी मागणी होती. या पुस्तकांच्या लाखो प्रती विकल्या गेल्या. इंग्रजीसह सहा भाषांमध्ये या पुस्तकाचे भाषांतर झालं आहे. केवळ महाराष्ट्रात नाही तर देश-विदेशात त्यांच्या आयुर्वेद उपचारांना मागणी होती.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!