करोनावर आयुर्वेद उपचारपद्धती फायदेशीर

अनेक रुग्णांना मिळत आहे लाभ; सुचवलेल्या आहार, योगासनांवर भर

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: सध्या करोना महामारीचा काळ असल्याने इतर उपचारांप्रमाणे आयुर्वेदिक उपचार मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. गृह विलगीकरणात राहणारे अनेक करोना रुग्ण गृह विलगीकरणाच्या किटप्रमाणे आयुर्वेदिक काढे तसेच गरम पाण्याची वाफ घेत आहेत. अयुर्वेदाने  सुचविल्याप्रमाणे आहार व योगासनांवर भर देत असून याचा करोना रुग्णांना मोठा फायदा होताना दिसत आहे. हजारो वर्षांपासून चालत आलेली आमची आयुर्वेदिक चिकित्सा करोना नियंत्रणात आणण्यासाठी खूप लाभदायक ठरत असून करोनावर आयुर्वेदाचा वाढता प्रभाव दिसत आहे. करोना व आयुर्वेदिक चिकित्सेवर राज्यातील काही आयुर्वेदिक आरोग्यतज्ज्ञांची मते जाणून करोना काळात आयुर्वेदिक उपचार किती फायदेशीर ठरत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

हेही वाचाः एमबीबीएस डॉक्टरांकडून प्रतिसाद नसल्यानं आता आयुष डॉक्टरांची होणार नेमणूक

आयुर्वेदिक तज्ज्ञांनी सुचविलेला आहार

करोना रुग्णांनी नाश्त्यात मुगाचे कढण गुळ न घालता, फुलका रोटी आणि चटणी, दलिया खिचडी, उपमा, थालीपीठ, तांदळाचे पोळे हे खावं, तर जेवणामध्ये वरण भात, भाजी, सुप, कढण, पेज, मुगडाळीची खिचडी, ज्वारीची भाकरी, फुलका रोटी इत्यादी खावं. डाळींमध्ये मुगडाळ, मसूरदाळ, तूरडाळ तर भाज्यांमध्ये कारली, शेवगा, गड्डे भाजी, कोबी, पालक, तांबडी भाजी, दुधी भोपळा, दोडकी, गाजर, मुळा, मेथी इत्यादी भाजी लाभदायक ठरत आहे. तर मसाल्यामध्ये धणे, जिरे, दालचिनी, लवंग, मिरी, हळद, सैंधव मीठ यांचा काढा वापरावा. दही, केळी, पनीर, चीज व बेकरी प्रोडक्ट हे पचायला जड असल्यानं ते शक्य तेवढे टाळावेत. खूप आबंट फळं न घेता आवळा किंवा आवळ्याचा जूस घ्यावा तो भरपूर व्हिटामीन सी देतो.

आयुर्वेदाने सुचविलेले उपचार

सूर्यनमस्कार, योगासनं, अनुलोम विलोम, प्राणायम, ध्यान इत्यादी करावं.

सकाळी दात घासल्यावर वाफ घ्यावी आणि गरम पाण्यात हळद व मीठ घालून गुळण्या कराव्यात.

रोज संध्याकाळी धूप घालावा.

ताप असताना आंघोळ करू नये.

एसी न लावता खिडक्या, उघड्या ठेवून खेळती हवा ठेवावी.

भूक लागल्यावर खावं आणि दोन खाण्यात किमात 3 तासांचं अंतर असावं.

सकाळी नाश्ता 8 ते 8.30 च्या आत, तर दुपारी 12 वाजेपर्यंत जेवण घ्यावं, रात्री 7 त 7.30 या वेळेत जेवण घ्यावं.

योग्य आहार महत्त्वाचा : डॉ. स्नेहा भागवत

करोना रुग्णांसाठी आयुर्वेदिक उपचार खूप लाभदायक ठरत आहेत. जर सुरुवातीपासून आयुर्वेदिक चिकित्सा करोना रुग्णांनी केली तर रुग्ण लवकर बरा होतो. तिन्ही स्तरातील करोना रुग्णांना आयुर्वेदिक उपचारामध्ये लाभ मिळत आहे. आयुर्वेदानुसार दिलेल्या सूचनांचं करोना रुग्णांनी पालन केलं, तर करोना मुळापासून पूर्णपणे बरा होतो. आयुर्वेदिक उपचार हे रुग्णांना त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास खूप मदत करतात. तसंच शरिरात कफ वाढू नये यासाठी तसा आहार दिला जातो. जड खाल्लेलं अन्न योग्यरित्या पचलं नाही, तर माणसाच्या पूर्ण शरिरात बिघाड होतो आणि रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. त्यामुळे सर्वप्रथम आहार योग्य असला पाहिजे. भूक लागेल तेव्हाच खाल्लं पाहिजे, असं मत अखिल गोवा आयुर्वेक डॉक्टर संघटनेच्या अध्यक्ष डॉ. स्नेहा भागवत यांनी व्यक्त केलं.

डॉ. स्नेहा भागवत

रोगाचं होतं मुळापासून निदान : डॉ. उपेंद्र दीक्षित

आयुर्वेदात रुग्णाचा इतिहास तसंच त्याची मूळ समस्या जाणून घेऊन औषधं दिली जातात. करोना हा असा आजार आहे, त्याच्यावर अजून 100 टक्के असं औषध तयार झाललं नाही, त्यामुळे अॅलोपॅथीमध्ये गुण मिळतो तशी औषधं दिली जात आहेत. पण आयुर्वेदात जी औषधं दिली जातात ती रोगाची मूळ समस्या जाणून मुळापासून रोग नष्ट होतो. आज अनेक करोना रुग्ण आयुर्वेदिक उपचार करून बरे झाले आहेत. गृह विलगीकरणात राहणारे अनेक रुग्ण आयुर्वेदिक उपचार घेत आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी अनेक औषधं आयुर्वेदामध्ये आहेत, असं शिरोडा येथील गोमंतक आयुर्वेदिक महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक डॉ. उपेंद्र दीक्षित यांनी सांगितल.

डॉ. उपेंद्र दीक्षित

पचायला हलका, ताजा आहार घ्या : डॉ. कृपा नाईक

करोना हा मुळात कमी रोग प्रतिकारक शक्ती असलेल्यांना जास्त धोकादायक ठरत आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती ही माणसाच्या जन्मापासून तयार होत असते. ही रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी जाठारअग्नी, पचनशक्ती उत्तम असावी. निसर्गात जसा बदल होत जातो तसाच माणसाच्या शरीरात बदल होत असतो. त्यामुळे आम्ही ऋतुनुसार आहार घेतला पाहिजे. तसंच आयुर्वेदाप्रमाणे दिनचर्या असली पाहिजे. रात्री शक्य तेवढं लवकर जेवण केलं पाहिजे. करोना संक्रमित झाल्यावर घरगुती उपचार न करता जवळच्या आयुर्वेदिक वैद्यांशी संपर्क साधावा. भीतीमुळे आजार वाढतो, त्यामुळे न घाबारता चिकित्सा करावी, असं आयुर्वेदिक डॉक्टर कृपा नाईक यांनी सांगितलं.

डॉ. कृपा नाईक

औषधांचा दुष्परिणाम नाही : डॉ. महेश वेर्लेकर

आयुर्वेद ही हजारो वर्षांपासून चालत आलेली चिकित्सा परंपरा आहे. आयुर्वेदिक औषधांचा आजपर्यंत कुठेच दुष्परिणाम जाणवलेला नाही. एक औषध अनेक उपचारांना लाभदायक ठरत आहे. म्हणून आज आयुर्वेदिक चिकित्सा जगभर पोहचली आहे. आयुष मंत्रालयाने करोना काळात जी मार्गदर्शन तत्त्वं लागू केली आहेत, त्यांचे आम्ही पालन केलं, तर करोनावर हे खूप लाभदाय ठरणार आहे. आयुष मंत्रालयाचे अनेक वैद्यकीय तज्ज्ञ करोना उपचारावर संशोधन करत आहे. त्यासाठी गुळवेल ही करोना काळात लाभदायक ठरत आहे. त्याचप्रमाणे `आयुष ६४` या औषधाला मान्यता दिली आहे. जर एलोपॅथी, होमियोपॅथी व आयुर्वेद एकत्र येऊन करोना नियंत्रणात आणण्यासाठी औषधोपचार केले तर नक्कीच करोनावर आम्ही विजय मिळवू शकतो, असं आयुर्वेदिक डॉक्टर महेश वर्लेकर यांनी सांगितलं.

डॉ. महेश वेर्लेकर

नारायण गवस (गोवन वार्ता प्रतिनिधी)

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!