धक्कादायक! वडिलांचा पोटच्या मुलावर जीवघेणा हल्ला

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी
थिवी : वडिलांनी मुलावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वळावणे थिवी येथे हा प्रकार घडलाय. घरगुती वादातून हा प्रकार घडलाय. वडिलांनी मुलावर हातोड्याने वार केलेत. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झालाय. यात तेवीस वर्षीय मुलगा आश्विन मांद्रेकर हा गंभीर जखमी झाला आहे. तर म्हापसा पोलिसांनी वडील संशयित संतोष मांद्रेकर यांना प्राणघातक हल्ल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.
कधी घडली घटना?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना सोमवारी पहाटे ३.३० च्या सुमारास घडली. मांद्रेकर वडील पुत्रा मध्ये कौटुंबिक वाद होता. जखमी आश्विन हा आपल्या खोलीत झोपला होता. पहाटेच्या सुमारास संशयीत वडील त्याच्या खोलीत हातोडा घेऊन गेला व झोपलेल्या स्थितीतच मुलाच्या डोक्यावर त्याने जोरजोराने हातोड्याचे झपाझप वार घातले.
या हल्ल्याने जखमी आश्विन जागा झाला आणि त्याने आरडा ओरडा केली. त्याच्या आवाजाने कुटुंबीय तसेच शेजारचे लोक जागे झाले. यानंतर त्यांनी संशयिताच्या तावडीतून तरुणाची सुटका केली.
जखमीवर उपचार सुरु
१०८ रुग्णवाहिकेतून जखमीला येथील जिल्हा इस्पितळ आणि नंतर गोमेकोमध्ये दाखल केलंय. तिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी संशयित संतोष मांद्रेकर विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या ३०७ कलमाखाली प्राणघातक हल्ल्याचा गुन्हा नोंद करून त्यास अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक किरण नाईक करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीय.