एटीएममधून पैसे लाटणारी टोळी जेरबंद

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पणजी : उत्तर गोव्यातील अनेक एटीएममध्ये स्किमिंग लावून नागरिकांना गंडा घातल्या प्रकरणी पर्वरी, हणजुणे आणि पणजी पोलिसांनी तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांत अब्दुल कादर (कर्नाटक), गुरप्रित सिंग (पंजाब), रादास्लोव्ह पिशेव (35), स्टीव्हन लाझारोव्ह (32) हुसैन आयझेट (34) या बल्गेरियाच्या नागरिकांसह केरळ येथील नील पिल्लै (25) या सहा जणांना अटक केली. यातील स्टीव्हन लाझारोव्ह, हुसैन आयझेट आणि नील पिल्लै यांना न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. संशयितांकडून 2 लॅपटॉप, 6 मोबाईल, स्प्रे गन, एटीएम स्किमिंग, पीओएस सोल्डरिंग मशिन व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एटीएममध्ये स्किमिंग मशिन लावून नागरिकाच्या बँक खात्यांतून पैसे लंपास केले जात असल्याची माहिती पर्वरी पोलिसांना सोमवारी प्राप्त झाली. याबाबत पर्वरी येथील कॅनरा बँकेचे मुख्य व्यवस्थापक सुरेश पै यांनी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीची दखल घेऊन पोलिसांनी अज्ञातांच्या विरोधात भा.दं.सं.च्या कलम 380, 420 आणि 511 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पर्वरी पोलिसांनी तत्काळ उत्तर गोव्यातील इतर पोलिस स्थानकाच्या प्रमुखांना माहिती दिली व तपास सुरू केला. पोलिसांनी एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेर्यांची तपासणी सुरू केली. संशयित हणजुणे परिसरात असल्याची माहिती त्यांना मिळाली. हणजुणे पोलिसांनी तिघा विदेशी नागरिकांना ताब्यात घेतले. यांपैकी दोघांना पणजी, तर एकाला पर्वरी पोलिसांकडे देण्यात आले.
दरम्यान, ताळगाव येथील शैलेश कुट्टीकर यांनी पणजी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत 4 सप्टेंबर रोजी चोपडे येथील एटीएममधून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या बँक खात्यातून 60 हजार रुपये काढल्याचे म्हटले आहे. तक्रारीची दखल घेऊन पणजी पोलिसांनी अज्ञाताविरोधात भा.दं.सं. कलम 420 नुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलिसांनी स्टीव्हन लाझारोव्ह (32) हुसैन आयझेट (34) या बल्गेरियाच्या नागरिकांना अटक केली. त्यानंतर यात सहभाग असल्यामुळे पोलिसांनी केरळ येथील नील पिल्लै (25) यालाही अटक केली. संशयितांना पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.
संशयास्पद फिरणार्या दोघांना पणजीत अटक
दरम्यान, हणजुणे पोलिसांनी रादास्लोव्ह पिशेव (३५) या बल्गेरियाच्या नागरिकाला पर्वरी पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याला पर्वरी पोलिसांनी वरील गुन्ह्यात अटक केली आहे. इतर संशयिताचा शोध सुरू आहे. पणजी पोलिसांनी पणजी परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना अब्दुल कादर (कर्नाटक), गुरप्रित सिंग (पंजाब) यांना ताब्यात घेऊन अटक केली. संशयितांकडून पोलिसांनी दोन पीओएस मशिन व इतर साहित्य जप्त केले आहे.