दिवस तिसरा : पहिल्या सत्राची सुरुवात रेंगाळत…

मंत्री-आमदारांकडून चर्चेचे गुर्‍हाळ

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : विधानसभेच्या तिसर्‍या दिवसाच्या कामकाजाला म्हणाला तसा वेग आला नाही. मंत्री-आमदारांनी चर्चेवर भर दिल्यामुळे दुसर्‍या दिवसाच्या पहिल्या सत्राचीच पुनरावृत्ती पाहायला मिळाली.

सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांच्या प्रश्नाबद्दल काही काळ संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. त्यावर मंत्री गोविंद गावडे यांनी उत्तर दिले. मात्र गावकर यांनी दुसर्‍या एका प्रश्नाचा उल्लेख केला. त्याबाबत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तसेच सभापती राजेश पाटणेकर यांनी स्पष्टीकरण दिल्याने ही चर्चा थांबली. मात्र या गोंधळात काही वेळ वाया गेला.

फोंड्याचे आमदार रवी नाईक यांनी क्रांती मैदानाचा विषय उपस्थित केला. त्यासंबंधी सार्वजनिक बांधकाम मंत्री दीपक पाउसकर यांनी दिलेल्या उत्तरावर नाईक समाधानी दिसले नाहीत. त्यांनी याबाबत मंत्री पाउसकर यांना छेडले. वेगवेगळे प्रश्न विचारून त्यांनी पाउसकरांची फिरकी घेतली. यात माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा मगोप आमदार सुदिन ढवळीकर यांनीही सहभाग घेतला. शेवटी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हस्तक्षेप करून रवी नाईक यांना समाधानकारक उत्तर दिल्याने चर्चा थांबली.

मात्र या चर्चेत बराच वेळ वाया गेला. नेमके उत्तर न मिळाल्याने रवी नाईक यांनी पुन्हा पुन्हा पाउसकर यांना संबंधित प्रश्नाशी उपप्रश्न विचारून भंडावून सोडले. पाउसकर यांना योग्य उत्तर न सुचल्याने काय उत्तर द्यावे, या विवंचनेत दिसले. मात्र त्यांच्या मदतीला मुख्यमंत्री सावंत धाउन आले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.