2022ची विधानसभा निवडणूक प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्वाखाली!

भाजप प्रभारी सी. टी. रवी यांची घोषणा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोव्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांच्याच नेतृत्वाखाली भाजप 2022च्या विधानसभा निवडणुकीला सामोरा जाईल, अशी घोषणा गोवा भाजपचे प्रभारी सी. टी. रवी (C. T. Ravi) यांनी केली.

भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पणजीत पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना रवी यांनी ही घोषणा केली. ही बैठक केंद्रीय मस्त्योद्योग आणि दुग्धोत्पादन खात्याचे मंत्री गिरीराज सिंग (Giriraj Sing) यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा गोवा प्रभारी सी. टी. रवी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, मंत्री मायकल लोबो, जेनिफर मोन्सेरात, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आदी उपस्थित होते.

गोमंतकीय जनता भाजपवरच विश्वास ठेवेल!

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेच पक्षाचा चेहरा असतील. प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांच्यासह सावंत भाजपला नक्कीच विजयश्री मिळवून देतील, असे रवी म्हणाले. गोव्याची जनता भाजपवर विश्वास दाखवून राज्याची सत्ता भाजपच्या हातात देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोव्यातील बूथ समित्या हा पक्षाचा कणा आहे. बूथ समित्या मजबूत करण्याला आमचे प्राधान्य राहील, असे रवी म्हणाले.

म्हादईप्रश्नी सुप्रीम कोर्टाचा आदेश शिरोधार्ह!

म्हादई नदीच्या पाणीवाटपाच्या प्रश्नावरून गोवा आणि कर्नाटक राज्यांमध्ये वाद सुरू आहे. रवी हे कर्नाटक भाजपचे नेते असल्यामुळे पत्रकारांनी त्यांना म्हादईप्रश्नी भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले. हा प्रश्न आता सुप्रीम कोर्टासमोर प्रलंबित आहे. त्यामुळे या संदर्भात कोणतेही राजकीय मत व्यक्त न करता रवी यांनी दोन्ही राज्ये सुप्रीम कोर्टाच्या अंतिम आदेशाचा आदर करतील, असे सांगितले.

नगरपालिका निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार : तानावडे

येत्या मार्चमध्ये होउ घातलेल्या 11 नगरपालिकांच्या तसेच पणजी महापालिकेच्या निवडणुका पक्षीय चिन्हावर होणार नाहीत. मात्र पक्ष पुरस्कृत उमेदवारांसह भाजप या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी सांगितले.

‘त्या’ तीन प्रकल्पांच्या समर्थनार्थ ठराव

या बैठकीवेळी तीन प्रकल्पांच्या समर्थनार्थ ठराव घेण्यात आला. रेल्वे मार्ग दुपदरीकरण, वीज प्रसारण लाइन आणि राष्ट्रीय महामार्ग विस्तार यांचा या ठरावात समावेश आहे. हे प्रकल्प राज्याच्या विकासासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी असल्याचे या ठरावात म्हटले आहे. सरचिटणीस दामोदर नाईक यांनी मांडलेल्या ठरावात विरोधी पक्ष आणि काँग्रेसच्या सरकारविरोधात चुकीच्या प्रचारावर टीका करण्यात आली. कार्यकारी समितीने केंद्रीय अर्थसंकल्प 2021-22चे स्वागत केले.

दरम्यान, यावेळी उत्तर गोव्याचे खासदार तथा केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या दिवंगत पत्नी विजया नाईक यांना आदरांजली वाहण्यात आली.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!