एमबीबीएस डॉक्टरांकडून प्रतिसाद नसल्यानं आता आयुष डॉक्टरांची होणार नेमणूक

तब्बल दीड महिना सुरू आहे प्रक्रीया ; 50 जागांसाठी केवळ 4 डॉक्टरांकडून प्रतिसाद

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गेल्या दीड महीन्यात दुस-यांदा प्रयत्न करूनही 50 जागांच्या भरतीसाठी एमबीबीएस डाॅक्टरांकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्यामुळं आता त्या जागांवर आयुष डाॅक्टरांची नेमणूक करण्याचा निर्णय आरोग्य खात्यानं घेतलाय. दरम्यान, किमान कोविडच्या तिस-या लाटेची दाट शक्यता पाहता या निर्णयाची तरी आरोग्यखात्यानं तातडीनं अंमलबजावणी करावी, अशी मागणी होतेय.

आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण
गेल्या काही महिन्यात गोव्यात कोविड रूग्णांच्या संख्येत झपाटयानं वाढ होतेय. पाॅझिटीव्हीटी रेटमध्ये देशातल्या पहिल्या तीन राज्यांमध्ये गोवा पोहोचला. दररोज मोठया संख्येन रूग्णांमध्ये वाढ होत आहे. मात्र त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ आरोग्य खात्याकडं उपलब्ध नाही. अनेकांना बेडही मिळत नसल्याचे फोटोही माध्यमांत झळकले होते. दरम्यान, खासगी रूग्णालयांमध्ये 50 टक्के बेड कोविड रूग्णांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णयही मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी काहीच दिवसांपूर्वी घेतला आहे.

तब्बल दीड महिना सुरू आहे प्रक्रीया
कोविड रूग्णांची झपाटयानं वाढणारी संख्या आणि अपुरं मनुष्यबळ यातली तफावत दुर करण्यासाठी एमबीबीएस डाॅक्टरांच्या 50 जागा भरण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र दीड महिन्यात दोनदा प्रयत्न करूनही याला प्रतिसाद मिळाला नाही. फक्त 4 जणांनीच याला प्रतिसाद दिल्याचं समजतं. दरम्यान, यासाठी स्थानिक उमेदवाराची अटही शिथिल करण्यात आली होती, जेणेकरून शेजारच्या राज्यातील डाॅक्टर्स येतील. मात्र त्यालाही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळंच आता आयुष डाॅक्टरांची नेमणूक करण्याचा निर्णय आरोग्य खात्यानं घेतलाय. सध्याची कोविडची बिकट स्थिती आणि तिस-या लाटेची शक्यता पाहता आरोग्य खात्यानं लवकरात लवकर यावर कार्यवाही करावी, अशी मागणी होतेय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!