प्रायोगिक रंगभूमीचे आधारवड अरुण काकडे यांचं निधन

साठहून अधिक वर्ष रंगभूमीवर कार्यरत काकडे यांच्या निधनानं समांतर रंगभूमीवर शोककळा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : प्रायोगिक रंगभूमीचे आधारवड आणि आविष्कार नाट्यसंथेचे सर्वेसर्वा अरुण काकडे यांचं आज मुंबईत निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. गेले काही दिवस ते आजारी होते. 2014 साली पंढरपूर इथं झालेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं. त्यांच्या निधनाबद्दल नाट्यवर्तुळात शोक व्यक्त होत आहे. आज रात्री 9 नंतर मुंबईत अंधेरी इथल्या पारसीवाडा स्मशानभुमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मुळचे नीरा नरसिंहपूर इथले असलेल्या काकडे यांनी, पुण्यात महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान प्राध्यापक भालबा केळकर यांच्या नाटकातून कारकिर्दिला सुरूवात केली. त्यानंतर मुंबईत सहनाट्यकर्मींच्या साथीनं त्यांनी ‘रंगायन’ संस्थेची स्थापना केली. ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘ससा आणि कासव’, ‘छोटे मासे मौठे मासे’ अशा काही वेगळ्या नाटकांची निर्मिती या संस्थेनं केली.

1971 मधे काकडे यांनी विजय तेंडुलकर, अरविंद देशपांडे, आणि सुलभा देशपांडे यांच्या साथीनं ‘आविष्कारची स्थापना’ केली. या संस्थेच्या व्यवस्थापनाची संपूर्ण धुरा काकडे यांनी उतार वयातही तितक्याच उत्साहानं सांभाळली. आविष्कारच्या छबीलदास चळवळीनं अनेक नाट्यकर्मी घडवले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!