कलाकारांना मिळणार 5 ते 10 हजारपर्यंत साहाय्य

कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांची माहिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोविडमुळे बिकट आर्थिक संकटात सापडलेल्या राज्यातील कलाकारांना आर्थिक आधार देण्यासाठी कला आणि संस्कृती खात्याने नवी योजना तयार केली आहे. योजनेद्वारे कलाकारांना प्रत्येकी ५ ते १० हजार रुपयांपर्यंतचे साहाय्य देण्याचा निर्णय खात्याने घेतला आहे. योजनेचा मसुदा तयार झाला असून ७ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होऊन तो सरकारच्या मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

कोविडकाळात संकट कोसळलेल्या पारंपरिक व्यावसायिकांना प्रत्येकी ५ हजार रुपये देण्याची योजना सरकारने क्रांतिदिनी जाहीर केली होती. त्यानंतर आता कलाकारांनाही अर्थसाहाय्य देण्याचे निश्चित झाले आहे. कलाकारांना अर्थसाहाय्य देण्यासाठी नवी योजना तयार करण्याचे अगोदरच निश्चित करून त्यासंदर्भातील मसुदा तयार करण्यात आला आहे. सोमवारी झालेल्या कला आणि संस्कृती खात्याच्या बैठकीत मसुद्यावर चर्चा करण्यात आली. योजनेसाठी स्थापन करण्यात आलेल्या ३० जणांच्या समितीतील पदाधिकाऱ्यांच्या सूचना विचारात घेऊन ७ जुलैच्या बैठकीत योजनेला मंजुरी देण्यात येईल आणि योजना सरकारच्या मंजुरीसाठी पाठवण्यात येईल, अशी माहिती कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री​ गोविंद गावडे यांनी दिली.

मार्च २०२० पासून राज्यात कोविड प्रसार सुरू आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी जारी करण्यात आलेला लॉकडाऊन आणि कर्फ्यूमुळे गेल्या दीड वर्षांपासून सांस्कृतिक कार्यक्रम पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे सांस्कृतिक कार्यक्रमांत नाटक, भजन आदींसारखे कलाप्रकार सादर करून उदरनिर्वाह चालवणारे कलाकार, तंत्रज्ञ दीड वर्षांपासून आर्थिक संकटात सापडलेले आहेत. अशांना मदतीचा हात देण्यासाठीच सरकारने ही योजना चालीस लावली आहे. योजनेअंतर्गत कलाकारांना प्रत्येकी ५ ते १० हजार रुपयांपर्यंतचे साहाय्य करण्याचे निश्चित झाले आहे. पण नेमका आकडा ७ जुलै रोजी निश्चित केला जाईल. योजनेला लवकरात लवकर सरकारी मंजुरी घेऊन येत्या विधानसभा अधिवेशनाआधी कलाकारांना अर्थसाहाय्य वितरित करण्याचा प्रयत्न आपण करत आहे, असेही मंत्री गावडे यांनी नमूद केले.

दरम्यान, कोविड प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने जारी केलेल्या लॉकडाऊन आणि राज्यव्यापी कर्फ्यू काळात सांस्कृतिक कार्यक्रम बंद पडल्याने कलाकारांसमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. अशा परिस्थितीत सरकारने कलाकारांना आर्थिक मदतीचा हात द्यावा, अशी मागणी राज्यभरातील कलाकारांकडून होत होती. त्याची दखल घेऊनच मंत्री गोविंद गावडे यांनी ही योजना चालीस लावली आहे.

मंत्री गोविंद गावडे म्हणतात…

  • योजना अंमलात आणण्यासाठी ३० जणांची समिती स्थापन केली असून, त्यांतील १२ जणांची उपसमितीही नेमली आहे. कलाकारांसाठीचे निकष, अर्ज, अटी तयार करण्याचे काम या समितीकडे देण्यात आले आहे.
  • वार्षिक दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या कलाकारांना योजनेचा लाभ देण्याचे तूर्तास ठरवण्यात आले आहे. पण त्याचा निर्णयही ७ जुलै रोजीच होईल.
  • अर्थसाहाय्य करताना कोणत्याही कलाकारावर अन्याय केला जाणार नाही. योजनेचा राज्यातील हजारो कलाकारांना लाभ दिला जाणार आहे.
ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!