किनाऱ्यावरही आर्टिफिशिअल इंटेलिजन्स!

Goan Varta Live | प्रतिनिधी
मडगाव : किनाऱ्यांवरील नजर ठेवण्यासाठी उच्च दर्जाचे व जास्त जागा व्यापणाऱ्या कॅमेरांची गरज आहे. त्यासाठी मोठ्या निधीची गरज असून केंद्राशी चर्चा झालेली आहे. पीपीपी तत्त्वावर किनाऱ्यांची माहिती देणारे फलक उभारून जाहिरातीला परवानगी देत कॅमेरा बसवण्यास सध्या सांगितले असून आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा वापर करत गैरप्रकार रोखण्याचे व किनारे सुरक्षित करण्यात येतील, असे पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमात पर्यटन वाढीबाबत बोलताना मंत्री खंवटे यांनी सांगितले की, किनारा व्यवस्थापन पॉलिसी तयार करण्यात आलेली आहे. केवळ किनाऱ्यावरील स्वच्छता नाही, तर किनाऱ्याकडे जाणाऱ्या वाटेवरील १०० मीटरपर्यंतचा परिसर स्वच्छ करण्यास सांगावे, अशी सूचना करण्यात आलेली होती. ती मान्य करण्यात आलेली आहे.
हेही वाचाः पाणी बिलांच्या ‘ओटीएस’ मधून १०.५० कोटी जमा
उच्च दर्जाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांव्दारे किनाऱ्यावर लक्ष ठेवण्यासाठी निधीची आवश्यकता आहे. केंद्राशी याबाबत चर्चा करण्यात आलेली आहे. पीपीपी तत्त्वावर किनाऱ्यांची माहिती देतानाच जाहिरात करण्याची परवानगी देत उच्च दर्जाचे कॅमेरा बसवावेत व आर्टिफिशिअल इंटेलिजन्सव्दारे त्याठिकाणी येणाऱ्या व्यक्तीची माहितीही घेतली जाईल व किनाऱ्यावर बेकायदेशीर प्रकार बंद होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, अशी माहिती खंवटे यांनी दिली.
काणकोण, सांगेसारख्या क्षेत्रात इको टुरिझमवर भर देणार आहे. कोलवा येथे २१ ते २३ एप्रिल पर्यटन फेस्टिवल आयोजित करण्यात आलेला आहे. स्वदेश दर्शन योजनेंतर्गत मिळालेल्या निधीतून दक्षिण गोव्यातील कोलवा किनाऱ्यावर साधन सुविधा उपलब्ध करून दिली जात आहेत. याचा फायदा पर्यटनवाढीसाठी होईल. याशिवाय आता सिंधुदुर्गातील किनाऱ्यांवर वॉटर स्पोर्टस् सुरू झालेले असून गोव्यातील पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारच्या टुरिझमवर भर दिला जात आहे. होम स्टे, ग्रामीण पर्यटन, इको पर्यटनाकडे लक्ष दिले जात आहे, अशी माहिती खंवटे यांनी दिली.
वॉटर स्पोर्टस् खासगीकरण नाही!
वॉटर स्पोर्टसबाबत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जेईएलकडून क्यू सिस्टिम आणली जात आहे. जादा दराची आकारणी, बेकायदेशीर व्यावसायिक व दलाल यांना रोखण्यासाठी हा प्रयत्न आहे. यातून स्थानिकांचा व्यापार वाढणार अाहे. त्याचे खासगीकरण केले जाणार नाही. काही आमदार राजकीय फायद्यासाठी गैरसमज पसरवत आहेत, असे मंत्री खंवटे यांनी सांगितले.
हेही वाचाः सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्याकडून मंत्रिपदांचा राजीनामा