पैकुळमध्ये मतदान केंद्राची व्यवस्था करा…

तात्पुरता पदपूल दुरुस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपई : गेल्या वर्षी रगाडा नदीला महापूर आल्यामुळे पैकुळ पूल वाहून गेला होता‌. तेथे नवीन पूल बांधण्याचे काम सुरू आहे‌. तात्पुरती व्यवस्था म्हणून नदीवर पदपूल उभारण्यात आला आहे‌. यंदाच्या पावसात सदर पदपुलाचे संरक्षक कठडे वाहून गेले आहेत. पंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी मतदारांना सदर धोकादायक पुलावरून जावे लागणार आहे. धोका लक्षात घेऊन पैकुळ गावातच  मतदान केंद्राची व्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे. याविषयीचे निवेदन नुकतेच संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले आहे.
हेही वाचा:तळीरामांना वाहतूक पोलिसांचा दणका ; 28 जणांवर कारवाई…

पैकुळ नदीवरील पूल कोसळला

त्या संदर्भात अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. गेल्या वर्षी जुलै महिन्यात सत्तरी तालुक्याच्या अनेक भागांना महापुराचा तडाखा बसला होता. यामध्ये पैकुळ नदीवरील पूल कोसळला होता. यामुळे पैकुळ व गुळेली दरम्यानचा संपर्क तुटला होता. नागरिकांची व्यवस्था व्हावी यासाठी नदीवर जलस्रोत खात्यातर्फे तात्पुरता पदपूल उभारण्यात आला होता. मात्र सदर पूलही यंदाच्या पावसात पाण्याखाली गेला व त्याचे संरक्षक कठडे वाहून गेले.
हेही वाचा:मोरजीत विविध प्रभागांत नातेवाईक आमने - सामने…

समस्येमुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता

त्यामुळे सदर पदपूल धोकादायक बनला आहे. या पदपुलाचे संरक्षक कठडे उभारण्याची मागणी करण्यात येत आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पंचायत निवडणुकीला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नदीच्या पलिकडे जावे लागणार आहे. संरक्षक कठडे नसल्याने पूल ओलांडणे धोक्याचे ठरू शकते. पुलाला पर्यायी मार्ग म्हणजे बोंडला मार्गे रस्त्याचा अवलंब करावा लागणार आहे. सदर रस्ता लांबपल्ल्याचा आहे. या समस्येमुळे मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पुढील चार दिवसांत पदपुलाच्या दुरुस्तीची मागणी पूर्ण न झाल्यास  ग्रामस्थ मतदानावर बहिष्कार घालण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:’या’ पंचायतीची निवडणूक भाजप, काँग्रेस नेत्यांसाठी प्रतिष्ठेची…

पैकुळ भागातील मतदारांना मतदानासाठी धोकादायक पुलावरून जावे लागणार आहे. गावातच मतदान केंद्राची व्यवस्था करा, अशी मागणी आम्ही निवडणूक यंत्रणेकडे केली आहे. मात्र या मागणीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. आमची मागणी मान्य न झाल्यास बरेच मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू शकतात. 

अजित देसाई, ग्रामस्थ, पैकुळ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!