पेडण्यातील नुकसानग्रस्त भागाची आर्लेकरांनी केली पाहणी

नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची केली स्वतःच्या खिशातून मदत; उगवे, तुळसकरवाडीला तौक्तेचा मोठा फटका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणेः मोपा विमानतळाच्या बांधकामाची माती तौक्ते चक्रीवादळात वाहून गेली आहे. ही माती उगवे तसंच तुळसकरवाडी येथील काजु बागायती आणि शेतात पावसाच्या पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. मात्र सुदैवाने उगवेतील घरांमध्ये हा मातीचा चिखल गेला नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पेडण्यातील मगोप नेते प्रवीण आर्लेकर यांनी या परिस्थितीची पाहणी करून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना स्वतःच्या खिशातून आर्थिक मदत दिली आहे.

हेही वाचाः तरुण तेजपाल खटल्याचा अंतिम निवाडा आज, काय लागणार निकाल?

तौक्तेचा उगवे-तुळसकरवाडीला फटका

मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाचं बांधकाम जोरात सुरू आहे. या विमानतळाच्या सर्व बाजूंनी पायथ्याशी गावं आहेत. गावाच्या वरच्या बाजूला काजू बागायती आहे. तसंच झाडं आहेत. पुढे शेतं आहेत. पाऊस आणि वाऱ्यासोबत १५ मे रोजी वादळ सुरू झालं, तेव्हा रात्री विमानतळ क्षेत्रातील माती पावसाच्या पाण्यासोबत वाहून खाली आहे. ही माती एका बाजूने उगवे गावाच्या दिशेने, तर दुसऱ्या बाजूने तुळसकरवाडीच्या बाजूने वाहत आली.

हेही वाचाः बापरे ! निम्मे भारतीय मास्कच वापरत नाहीत

शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

उगवेचे माजी सरपंच शशीकांत महाले, रामदास महाले, निखिल महाले आणि काका महाले यांचं यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. वाहून आलेली माती दोन ते तीन मीटर इतकी दाट असून त्यात मोठे दगडही आहेत. विमानतळाचं काम सुरू असल्याने पाण्याचा प्रवाह उगवेच्या बाजूने वळविण्यात आल्यानं हा प्रकार घडला. तर दुसऱ्या बाजूने तुळसकरवाडी येथेही अशाच प्रकारे पाण्याच्या प्रवाहाबरोबर चिखल माती काजू बागायतीवर साचली आहे, तर काही घरातही अशी चिखल माती जाऊन मोठं नुकसान झालं आहे.

हेही वाचाः धक्कादायक ! काळ्या बुरशीपाठोपाठ आता पांढऱ्या बुरशीचंही नवं संकट !

गोवा सरकारने आपली नैतिक जबाबदारी पार पाडावी

आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प बांधत असताना, भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून प्रकल्पाला हात घालायला हवा होता. पाण्याचे स्रोत कुठे आहेत, पावसाळ्यात पावसाचं पाणी कुठे जाईल, त्या पाण्याची व्यवस्था करणं गरजेचं होतं. जेणेकरून असा प्रकार घडला नसता. या प्रकाराला जी एम आर कंपनी पूर्णपणे जबाबदार आहे, ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्या शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई द्यावी. तसंच गोवा सरकारने आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून सर्व शेतकऱ्यांना आर्थिक सहकार्य करावं, अशी मागणी आर्लेकरांनी केली.

हेही वाचाः परिणाम शून्य म्हणून रेमडेसिव्हीर उपचारातून वगळलं- WHO

कंपनीचा बेजबाबदारपणा लोकांच्या जीवावर बेतला असता

उगवेचे उप सरपंच तथा मोपा विमानतळ संघर्ष समितीचे निमंत्रक सुबोध महाले म्हणाले, बेपर्वाइने वागणाऱ्या, विमानतळाचं काम करणारी जी एम आर कंपनीच्या बेजवाबदारपणामुळे ही घटना घडली आहे. या कंपनीने आपलं खरं रूप दाखवलं आहे. आतापर्यंत ही कंपनी शेतकऱ्यांच्या आणि स्थानिकांच्या हिताविरूद्ध वावरत आली आहे. हा असा बेजवाबदारपणा लोकांच्या जीवावरही बेतू शकला असता. या कंपनीला लोकांबद्दल किती आस्था आहे हे या घटनेने दाखवून दिलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!