पेडणे तालुक्यातील प्रकल्प खरोखरच पेडणेकरांसाठी?

पेडणेकरांचा सवला; बेरोजगारी हटवा; राजन कोरगावकरांची मंत्र्यांकडे मागणी

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः पेडणे मतदारसंघाचे आमदार तथा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे नेहमी म्हणत असतात, की जे पेडणे तालुक्यात प्रकल्प आणले गेलेत ते प्रकल्प पेडणे तालुक्यातील नागरिकांसाठी आहेत. पण जे प्रकल्प मतदारसंघात चालू आहेत, होऊ घातलेले आहेत, ते प्रकल्प खरोखरच पेडणेकारांसाठी उभारले जातायत, की बाहेरच्यांना संधी देण्यासाठी? असा प्रश्न पेडणेकरांच्या मनात घर करू लागला.

हा संशोधनाचा विषय

पेडणे तालुक्यात होऊ घातलेले मोपा विमानतळ, तुये येथील आयटी प्रकल्प, धारगळ येथील आयुष हॉस्पिटल, नियोजित आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, मोपा परिसरातील एरोसिटी हे प्रकल्प मार्गी लागणार आहेत. या प्रकल्पातून नक्कीच स्थानिकांना रोजगार, विविध व्यवसाय संधी मिळतील की भलत्यांनाच त्याचा लाभ होणार आहे, हा मोठा प्रश्न आहे. सध्या मोपा विमानतळ, आयुष हॉस्पिटल आणि तुये येथील इलेक्ट्रॉनिक सिटी या प्रकल्पांचं काम सुरू आहे. प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वी पेडणेकरांना किती रोजगार आणि काम चालू असताना किती प्रकारचा व्यवसाय मिळाला, याची माहिती कुणालाच नाही. मग प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर किती जणांना इथे रोजगार आणि व्यवसाय संधी मिळणार, हा तर संशोधनाचा विषय आहे.

मग पेडणेकरांनी कुणाकडे भांडावं?

जर पेडणे तालुक्यातील जनतेसाठी हे प्रकल्प येत असतील, तर दोन्ही लोकप्रतिनिधींनी प्रकल्प पूर्ण होण्यापूर्वी किती जणांना रोजगार देणार याची माहिती द्यायला हवी. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर स्थानिकांनाच रोजगार मिळेल याची ग्वाही कोण देणार? आताच प्रकल्पातील विविध कामं, ट्रान्सपोर्ट, बांधकामाचे लहान लहान ठेके हे बिगर गोमंतकीयांना दिले जातायत आणि लोकप्रतिनिधी गप्प आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर स्थानिकांना रोजगार आणि व्यवसाय मिळवून देण्याची ग्वाही कोणीही देऊ शकत नाही. ज्या वेळी प्रकल्प पूर्ण होतील त्यावेळी कदाचित लोकप्रतीनिधी आणि सरकारशिवाय ठेकेदारही बदललेले असतील. मग पेडणेकरांनी कुणाकडे भांडावं, अशी स्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होतेय.

बेरोजगारी हटवाः राजन कोरगावकर

पेडणे मतदारसंघातील बेरोजगारीचा प्रश्न गंभीर आहे. आजपर्यंत निवडून आलेल्या आमदारांनी हा विषय गांभीर्याने घेतलेला नाही. किंवा बेरोजगारी हटवण्याच्या नजरेतून आजपर्यंत एकही प्रकल्प आणलेला नाही. सध्या विमानतळ आणि आयुष हॉस्पिटल हे केंद्र सरकारचे प्रकल्प आहेत. स्थानिक आमदाराने बेरोजगारी हटवण्यासाठी राज्य पातळीवरून कोणते प्रकल्प आणले, असा सवाल कोरगाव येथील उद्योजक राजन कोरगावकरांनी उपस्थित केलाय. सर्वांनाच सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत. मात्र तालुक्यात राज्य सरकार चांगले उद्योग व्यवसाय आणू शकतात. त्यातून आठवी पास ते उच्चशिक्षित युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. तसा प्रयत्न आजपर्यंत निवडून आलेल्या राखीव मतदारसंघातील लोकप्रतिनिधीने का केला नाही, असा सवाल कोरगावकरांनी उपस्थित केलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!