बाल शौर्य पुरस्कारासाठी २७ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचं आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी
नवी दिल्लीः येथील भारतीय बाल कल्याण मंडळाने बाल शौर्य पुरस्कारासाठी अर्ज मागवले आहेत. धाडसी कार्याबद्दल मंडळाच्यावतीने मुलांना शौर्य पुरस्कार देण्यात येतो. धाडसाचं काम केलेल्या मुलांची दखल घेणं आणि अशा मुलांकडून इतर मुलांनी प्रेरणा घेणं या उद्देशाने हे पुरस्कार देण्यात येतात. आपला जीव धोक्यात घालून दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी धाडसाचं काम केलेल्या मुलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.
हेही वाचाः डी. पुरंदेश्वरी यांनी घेतलं महालक्ष्मी देवीचं दर्शन
कोण करू शकतो अर्ज?
या पुरस्कारासाठीची नामांकने विहीत अर्ज नमुन्यातून स्वीकारण्यात येतील. अर्ज भारतीय बाल कल्याण मंडळाच्या मुख्यालयातून किंवा मंडळाच्या संकेतथळावरून मिळविता येतो. अर्जदार म्हणून मूल शिकत असलेल्या शाळेचे प्राचार्य/मुख्याध्यापक, पंचायत/जिल्हा परिषद प्रमुख, राज्य बाल कल्याण मंडळाचे अध्यक्ष किंवा सचिव, जिल्हाधिकारी, समान श्रेणीतील सरकारी अधिकारी, पोलीस अधिक्षक किंवा वरील श्रेणीतील पोलीस अधिकारी यांच्यामधील दोघांजणांची शिफारस असली पाहिजे. अर्जासोबत सुमारे २५० शब्दांत लिहीलेला धाडसी घटनेचा तपशील जोडला पाहिजे. त्याचप्रमाणे जन्म दाखला, बातमीपत्र किंवा दैनिकांतील कात्रण, पोलीस स्टेशनवर नोंद झालेला एफआयआर आणि इतर दाखल्यांवर पात्र अधिकारिणींनी सही केली पाहिजे.
हेही वाचाः खवळलेल्या समुद्रात तीन बोटी बुडाल्या
मुलाचं वय किती असलं पाहिजे?
२०२१ वर्षाच्या पुरस्कारासाठी धाडसाची घटना घडलेल्या दिवशी मुलाचं वय ६ वर्षांखाली आणि १८ वर्षांवर असू नये आणि घटना १ जुलै २०२० आणि ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत घडलेली असावी.
हेही वाचाः शिवोलीत आतेसासूंचा खून; भाची सुनेवर आरोप निश्चित
पुरस्काराचं स्वरुप
पदक, (सुवर्ण, रौप्य ), प्रशस्तीपत्र आणि रोख असं पुरस्काराचं स्वरूप आहे. भारत पुरस्कार १ लाख रूपये रोख, ध्रुव पुरस्कार ७५ हजार रूपये रोख, मार्कंडेय पुरस्कार ७५ हजार रूपये रोख, श्रावण पुरस्कार ७५ हजार रूपये रोख, प्रल्हाद पुरस्कार ७५ हजार रूपये रोख, एकलव्य पुरस्कार ७५ हजार रूपये रोख, अभिमन्यू पुरस्कार ७५ हजार रूपये रोख आणि सर्वसामान्य पुरस्कार ४० हजार रूपये रोख असे एकूण पुरस्कार देतात. हे पुरस्कार नवी दिल्लीत होणाऱ्या खास सोहळ्यात देण्यात येतात. पात्र पुरस्कार मानकऱ्यांना त्यांचं शिक्षण पूर्ण होईपर्यंत आर्थिक मदत दिली जाते.
हेही वाचाः ‘उत्पादन शुल्क’ ची कणकवलीत मोठी कारवाई
अधिक माहितीसाठी इथे संपर्क करा
अर्ज आणि अधिक माहितीसाठी महिला आणि बाल कल्याण संचालनालय, पणजी येथे २२३५३०८/२४२६११२ या फोन क्रमांकावरून संपर्क करावा किंवा www.iccw.co.in संकेतस्थळावर भेट द्यावी. अर्ज २७ ऑगस्ट २०२१ पर्यंत सॉफ्ट कॉपी (सीडी/पॅनड्रायव्ह) आणि हार्ड कॉपीद्वारे सुपूर्द करावेत.