‘भाजपच्या कर्नाटकी निरीक्षकाला गोव्याची पर्वाच नाही’

आपचा सी टी रवी यांच्यावर हल्लाबोल

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : भाजपने काँग्रेसचा कित्ता गिरवल्याचं मत व्यक्त करीत आम आदमी पक्षाने भाजपला लक्ष्य केलंय. काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी गोव्याचे हित पायदळी तुडविताना गोव्याच्या भल्याची आहुती दिली आहे, अशी टीका आपने केली आहे. दोन्ही पक्षांच्या गोव्यातील पार्टी युनिटमध्ये कर्नाटकांतील व्यक्तींना प्रमुख अथवा प्रभारी म्हणून नेमण्यात आलंय. म्हादईचे पाणी वळवून आपली दादागिरी कर्नाटकला करता यावी म्हणून गोवेकरांना एकप्रकारे डिवचण्याचाच हा प्रकार आहे, असं आम आदमी पक्षाने म्हटलंय.

आम आदमी पक्षाची भूमिका या विषयावर मांडताना पक्ष निमंत्रक राहुल म्हांबरे यांनी म्हटले आहे की…

विशेष मुद्दा हा आहे की भाजप आणि काँग्रेस यांनी कर्नाटकात त्या त्या पक्षाचे पुर्वाश्रमीचे अथवा माजी मंत्री राहिलेल्या व्यक्ती गोवा युनिटच्या प्रमुख म्हणून नेमलेल्या आहेत. भाजपने सी. टी. रवी यांना गोवा प्रमुख म्हणून नेमले आहे तर काँग्रेसने दिनेश गुंडू राव यांना गोवा प्रभारी अथवा प्रमुख म्हणून नेमलेले आहे. दोन्ही राजकीय पक्षांनी कर्नाटकातील व्यक्तींना गोवा प्रमुख म्हणून नेमण्याचा प्रकार पाहिल्यास म्हादईचे पाणी गोव्यासाठी वाचविण्याच्या लढाईमध्ये या दोन्ही पक्षांनी समझोता केला असल्याचे स्पष्ट होते. महत्वाचा मुद्दा पुढे असाही आहे की गोव्याची याचिका ऐकण्याच्या प्रक्रिये दरम्यान केंद्र सरकारने कर्नाटक सरकारला निष्ठुरपणे म्हादई नदीच्या प्रवाहात बांध उभारण्याची परवानगी दिली. या वास्तवाविषयी गोमंतकीय लोक जागे होत असताना आणि लढा उभारण्याची तयारी करीत असताना आता या दोन्ही राजकीय पक्षांनी कर्नाटकाच्याच माजी मंत्र्यांना त्यांच्या पक्षाच्या गोवा शाखेचे प्रमुख म्हणून नेमले आहेत म्हणजे म्हादईचे पाणी वळविण्याच्या प्रकारामध्ये राज्याला आपली बाजू सक्षमपणे मांडणे शक्य होऊ नये, यासाठी हा डाव आहे.

“भाजप आणि काँग्रेसचा डाव आणि मनसुबे आता उघडे पडलेले आहेत कारण हे स्पष्ट होते की त्यांना कर्नाटकसारख्या मोठ्या राज्याची जास्त पर्वा आहे कारण कर्नाटक हे राज्य त्यांना जास्त खासदार देऊ शकते आणि गोव्यासारख्या छोट्या राज्यातून लोक सभेमध्ये केवळ दोन खासदार जात असल्याने गोवा त्यांच्या खिजगणतीतही नाही आणि गोव्याला ते कवडीमोलाचीही किंमत देत नाहीत, हे सिद्ध होत असल्याचे पाहायला मिळते ” असं राहुल म्हणाले. म्हांबरे यांनी पुढे स्पष्ट केलं की कर्नाटक येथील व्यक्तींचा गोव्यातील पक्षाचे कामकाज हाताळण्यासाठी नियुक्त करण्याच्या प्रकाराला आम आदमी पक्ष तीव्र विरोध करीत आहे आणि गोव्याच्या हिताबरोबर समझोता करण्याचाच हा प्रकार आहे. म्हांबरे यांनी यावेळी नमूद केले की आपला पक्ष नेहमीच गोमंतकीय लोकांबरोबर उभा राहणार आहे आणि प्रत्येक आवश्यक स्तरावर राज्याच्या हिताचे रक्षण करणार आहे.

भाजपचे केंद्र सरकार राजकीय फायद्यासाठी कर्नाटकाला झुकते माप देत आहे आणि राज्य प्रभारी अथवा निरीक्षक पदासाठी कर्नाटक येथील मोठ्या नेत्यांची नेमणूक करणे ही कृती भाजपचे खरे रंग आपल्याला दाखविते. आम्हाला पुन्हा एकदा भाजप आणि काँग्रेस यांना आठवण करून द्यावीशी वाटते की “गोवा हा गोमंतकीयांसाठी आहे ” आणि गोव्यातील लोकांच्या हिताशी करण्यात आलेला कुठल्याही प्रकारचा समझोता आम आदमी पक्षातर्फे कधीही सहन केला जाणार नाही, असंही आपच्या नेत्यांनी म्हटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!