POLITICS | भाऊंची माफी मागा अन्यथा शाप भोगा

आजगांवकर, पाऊसकरांच्या कृतीने मगो कार्यकर्ते खवळले

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजीः पेडणेचे आमदार आणि उपमुख्यमंत्री मनोहर ऊर्फ बाबू आजगांवकर आणि सावर्डेचे आमदार तथा पीडब्लूडीमंत्री दीपक प्रभू पाऊसकर यांनी पक्षांतर करून भाजपात जाणं योग्य की अयोग्य हे जनता ठरवणार, परंतु राज्यातल्या बहुजन समाजाला मान सन्मान, प्रतिष्ठा आणि बहुजन समाजाची ओळख बनलेला मगो पक्ष भाजपात विलीन करण्याचा अधिकार या द्वयींना कुणी दिला, असा खडा सवाल मगो कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय. भाऊसाहेब बांदोडकर यांच्या पक्षाचा असा विश्वासघाताने गळा घोटणं हे या उभय नेत्यांना अजिबात पचणार नाही. राज्यातल्या बहुजनांचे शाप आता त्यांचा पिच्छा सोडणार नाहीत असा घणाघात पेडणेचे मगो नेते जीत आरोलकर आणि प्रविण आर्लेकर यांनी केलाय.

इतकी नीच पातळी का गाठली

मगो पक्षाला एक वेगळा इतिहास आहे. भाऊसाहेब बांदोडकर यांनी तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास करून राज्यातल्या बहुजन समाजाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या बळकटी मिळवून देण्यासाठी मगो पक्षाची स्थापना केली. देशात सर्वंत्र काँग्रेसची सत्ता असूनही एका साध्या प्रादेशिक पक्षाची सत्ता गोव्यात स्थापन झाली हा एक वेगळाच इतिहास होता. भाऊसाहेब बांदोडकर यांनी आपल्या कार्यकाळात बहुजन समाजाच्या विकासाचा पाया रचला. शिक्षणाची सोय केली. उद्योग स्थापन करून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. कुळ- मुंडकारांना अधिकार देण्यासाठीच्या कायद्यांचा पाया रचला, शेतकऱ्यांना आधार दिला. या पक्षाच्या नावावर आणि भाऊसाहेबांच्या पुण्याईवर अनेक नेते राजकारणात आले. मगो पक्षाचा विश्वासघात केलेले कित्येक नेते राजकारणातून नेस्तनाबूतदेखील झाले. ढवळीकरबंधूंवर कुणी कितीही आरोप केले तरी त्यांनी मगो पक्ष जिवंत ठेवला हे सत्य कुणीही नाकारू शकणार नाही. मगो पक्ष भाजपात त्यांनी विलीन केला असता, तर आज ढवळीकर कदाचित राज्याचे मुख्यमंत्रीही झाले असते. परंतु हे पाप त्यांनी कधीच केलं नाही. शेवटी सत्ता आणि स्वार्थाने पछाडलेले बाबू आजगांवकर आणि दीपक पाऊसकर यांनी सत्तेच्या कैफात मगो पक्ष विलीनीकरणाचं पाप आपल्या डोक्यावर घेतलेय. राजकारणात इतकी नीच पातळी त्यांनी का गाठली, असा सवाल आरोलकर आणि आर्लेकर यांनी केलाय.

भाऊसाहेब बांदोडकर

मगोमुळेच बाबू आजगांवकरांची ओळख

राज्यातला एकमेव पेडणे मतदारसंघ अनुसुचित जातींसाठी राखीव आहे. ही राखीवता मगो पक्षाच्या राजवटीतच देण्यात आली. ही राखीवता घटनेद्वारे मिळाली हा युक्तीवाद अगदी बरोबर आहे. तसं पाहिलं तर राज्यात अनुसुचित जमातींनाही घटनेद्वारे राखीव मतदारसंघ मिळायला हवेत. पण त्यांची ही मागणी अजूनही पूर्ण होत नाही. मगो पक्षामुळे पेडणे मतदारसंघ राखीव झाला आणि त्यामुळेच मडगावच्या गांधी मार्केटातून बाबू आजगांवकर पेडणेत येऊन निवडणूक लढवू शकले आणि मोठे नेते बनले. मगो पक्षाचा गळा घोटताना त्यांनी किमान याची जाणीव ठेवायला हवी होती. पेडणे तालुक्यासाठी मगो पक्ष काय, हे बाबू आजगांवकर यांना कदापी कळणार नाही. त्यांच्यासोबत असलेले अनेक कार्यकर्ते पूर्वी मगो पक्षाच्या संस्कारातूनच घडले आहेत. ते आज बाबू आजगांवकर यांच्यासोबत आहेत पण मगो पक्षाचे पेडणेतील महत्व केवळ तेच सांगू शकतात. बाबू आजगांवकर यांनी मगो पक्षाचा केलेला विश्वासघात त्यानाही रूचलेला नाही,असंही यावेळी आर्लेकर म्हणाले.

Babu 800X450
मनोहर ऊर्फ बाबू आजगांवकर

माफी मागावी लागणार

म्हार्दोळची श्री म्हाळसादेवी तसंच पेडणेची श्री भगवती देवी या मगो पक्षाच्या स्थापनेच्या प्रत्यक्ष साक्षीदार आहेत. या उभय देवतांचे आशीर्वाद घेऊनच मगो पक्षाच्या कार्याला सुरुवात झाली होती. बाबू आजगांवकर यांनी मगोची संजीवनी वापरून पुन्हा राजकारणात फेरप्रवेश केला. बाबू आजगांवकर आणि दीपक पाऊसकर यांना ते स्वतःच्या हिमतीवर निवडून आले होते, असं जर वाटत होतं तर त्यांनी राजीनामे देऊन नव्याने निवडणूक लढवून यायला हवं होतं. मगो पक्षच भाजपात विलीन करण्याचं कटकारस्थान त्यांना भविष्यात महागात पडणार. जोपर्यंत ते जनतेची माफी मागणार नाहीत. मिरामारला जाऊन भाऊसाहेब बांदोडकर यांच्या समाधीपुढे डोके टेकून क्षमायाचना करणार नाहीत तोपर्यंत नियती त्यांना स्वस्थ बसू देणार नाही, अशी भविष्यवाणीही या मगो युवा नेत्यांनी केलीये.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!