पुन्हा चिंता, २४ तासांत कोविडचे ५ बळी

पाच दिवसांत ४६४ जणांना संसर्ग; मुख्यमंत्र्यांकडून दक्ष राहण्याचे आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यात चतुर्थीची लगबग चालू असतानाच कोविडने डोके वर काढल्याने पुन्हा चिंता वाढली आहे. आरोग्य खात्याने रविवारी सायंकाळी जारी केलेल्या दैनंदिन अहवालानुसार, गेल्या २४ तासांत पाच कोविडबाधितांचा बळी गेला आहे. तर गेल्या पाच दिवसांत ४६४ जणांना संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रक जारी करून गोमंतकीयांनी अत्यंत सतर्क राहून सण साजरा करावा, असं आवाहन केलं आहे.

हेही वाचाः प्रलंबित मागण्यांसाठी एसीजीएल कामगार आक्रमक

बरं होण्याचा आलेखही किंचित घसरला

शनिवार ते रविवारी संध्याकाळपर्यंतच्या २४ तासांत ७२ नव्या बाधितांची नोंद झाली आहे तर, ८९ रुग्ण बरे झाले आहे. यामुळे रुग्ण सापडण्याचं प्रमाण १.३ टक्के असून बरं होण्याचं प्रमाण ९७.६४ टक्के इतकं आहे. असं असलं तरी गेल्या पाच दिवसांचा आढावा घेतल्यास या काळात ४६४ नवे बाधित सापडले आहे तर, ४३४ जण बरे झाले आहेत. म्हणजे सप्टेंबर महिना चालू झाल्यापासून बरे होण्याचा दर हळूहळू खाली येत असल्याचे स्पष्ट होत आहे.

१६ ऑगस्टनंतर प्रथमच वाढली संख्या

१ ऑगस्टपासून बळींचा आढावा घेतल्यास हा आकडा शून्य ते ३ पर्यंतच मर्यादित राहिला होता. केवळ १६ ऑगस्ट रोजी ५ जणांचा मृत्यू झाला होता, तर २६ ऑगस्टला चौघांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मृत्यूचे प्रमाण नियंत्रित होते. पण रविवारी पुन्हा ही संख्या पाचवर पोहोचली आहे. या पाचमध्ये चार महिलांचा समावेश आहे. यात बेतालभाटी (५२), कोलवा (८९), पणजी (९६) आणि पाळोळे (६५) येथील महिलांचा समावेश आहे. तर देवगड (ता. सिंधुुदुर्ग) येथील ८२ वर्षांच्या पुरुषाचा मृत्यू झाला आहे. यातील तिघांचा मृत्यू गोमेकॉत तर दोघांचा मृत्यू दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात झाला आहे.

हेही वाचाः स्वप्नील परबवरील हद्दपारीची कारवाई न्यायालयाकडून रद्द

लसीकरणानंतर वाढतोय निष्काळजीपणा

कोविडला नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात कर्फ्यू लागू असला तरी बहुतांशी व्यवहार सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. बाजारपेठाही खुल्या करण्यात आल्या आहेत. चतुर्थीचा सण चार दिवसांवर येऊन ठेपल्याने बाजारपेठांमध्ये गर्दीही वाढत चालली आहे. गेल्या महिनाभरात झालेले लसीकरण आणि नियंत्रणात आलेली दुसरी लाट पाहता अनेकजण निष्काळजीपणे वावरू लागले आहेत. बरेच लोक मास्कविना बाजारात फिरताना दिसत आहेत.

हेहीः सोनू यादवला गोळी मारली कोणी?

‘सार्वजनिक मंडळांकडून अद्याप एसओपी नाही’

गेली दोन वर्षे कोविडमुळे चतुर्थीवर काहीसे विरजण पडलं होतं. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी विशेष मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) जारी केली होती. मात्र, यंदा तशी कोणतीच एसओपी जारी केलेली नाही. शिवाय गेल्या वर्षापेक्षा यंदा निर्बंध शिथिल राहिल्याने बाजारातही गर्दी वाढत चालली आहे. यावर वेळीच खबरदारी न घेतल्यास आगामी काळात पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.

हेही वाचाः हिंमत असेल तर कुंभारजुवेतून विजयी होऊन दाखवा!

सल्लागार समितीकडून निर्बंधांची शिफारस

– करोनाचे दोन डोस घेतलेल्यांना परराज्यांतून थेट प्रवेश देण्याची सूट राज्य सरकारने दिल्यानंतर, परराज्यांतून येणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यात आगामी काळात चतुर्थी असल्याने कोविड विषयक उच्चस्तरीय सल्लागार समितीने सरकारकडे महत्त्वपूर्ण शिफारशी केल्या आहेत.
– राज्यातील १८ वर्षांखालील मुलांचे अद्याप कोविड प्रतिबंधक लसीकरण झालेले नाही. त्यामुळे त्यांच्यात या विषाणूशी लढण्यासाठी आवश्यक रोगप्रतिकारक शक्ती नाही. या कारणाने अशा मुलांना ‍गणेश चित्रशाळेत प्रवेश दिला जाऊ नये.
– अलीकडच्या काळात केरळमध्ये ‘डेल्टा प्लस’सह करोनाचे अन्य धोकादायक व्हेरियंट वाढल्याने तेथून येणाऱ्या प्रत्येकाला कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करावं. असं प्रमाणपत्र नसल्यास ते मिळेपर्यंत त्यांना सक्तीने विलगीकरणात ठेवावं.

आधीचेच नियम कायम ठेवत कर्फ्यूत वाढ

राज्य सरकारने पुन्हा एकदा राज्यव्यापी कर्फ्यूत आठवडाभराची वाढ केली आहे. आधीच्या कर्फ्यूची मुदत सोमवार, ६ रोजी सकाळी ७ वाजता संपत आहे. या पार्श्वभूमीवर १३ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कर्फ्यू वाढवण्यात आला आहे. तसा आदेश दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी जारी केला. १० सप्टेंबरला चतुर्थी आहे. अजून राज्यातील लसीकरण पूर्ण झालेलं नाही. शिवाय करोना पूर्णपणे संपलेला नाही. त्यामुळे या कर्फ्यूत काही नवे निर्बंध असावेत, अशी चर्चा होती. पण तसं कोणतंच नवे निर्बंध आदेशात नाहीत. गेल्या आठवड्यात मुदतवाढ देताना जे नियम होते, तेच आता कायम ठेवण्यात आले आहेत.

हा व्हिडिओ पहाः DOG ATTACK | कुत्र्यांकडून 20 पेक्षा अधिक चावे

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!