‘या’ गावाच्या नशिबी खडतर रस्ता!

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी
नगरगाव : भिरोंडा (सत्तरी) ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये अनसुले नावाचा एक लहानसा गाव आहे. हा गाव मुख्य शहर वाळपईपासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे. परंतु अजूनपर्यंत विकासापासून वंचित असलेल्या या गावात जाण्यासाठीचा रस्ता विकासाइतकाच बिकट आणि खड्डेमय झाला आहे.
निवडणुकीत मतदान असते तेव्हाच फक्त राजकीय लोक वेगवेगळ्या विकासकामांची आश्वासने देतात. परंतु, निवडणूक झाली की दिलेली आश्वासनांची पूर्तता मात्र होत नाही. या गावातील लोकांचा फक्त मतदान घेण्यासाठीच उपयोग केला जातो. गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नाही संपूर्ण रस्ता खड्डेमय झालेला आहे. गावात नालेसुद्धा बांधलेले नाहीत. गावातील बरेचसे लोक दुग्ध व्यवसाय करतात. परंतु गावात जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्यामुळे त्यांना फार त्रास होतात. पक्का रस्ता नसल्यामुळे गावात प्रवासी बसेस वगैरे येतच नाही. त्यामुळे शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांसाठी चालतच जावे लागते. चालत जाताना यापूर्वी काही विद्यार्थी रस्त्यावर पडून त्यांना दुखापतीसुद्धा झालेल्या आहेत.
वाढती बेरोजगारी या गावातील लोकांची डोकेदुखी बनली आहे. गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या गावातील रस्त्यांच्या प्रश्न मार्गी लावावा व जो गाव विकासापासून वंचित आहे त्या गावाचा कायपालट करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
मतदानावर बहिष्कारही घालून पाहिला…
2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी अनसुलेवासीयांनी मतदानावर बहिष्कार घातला होता. लोकांनी आधी रस्ता करावा नंतरच मतदानाचा विचार करू असा पवित्रा घेतला होता. त्यानंतर उत्तर गोवा जिल्हाधिकार्यांनी गावात येऊन बैठकीत लोकांची समजूत काढली होती. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वत: लोकांशी संपर्क करून रस्ता करण्याचे आश्वासन दिले. परंतु, निवडणुकीपासून आजपर्यंत फक्त निविदा काढण्याव्यतिरिक्त काहीच झाले नाही.