CRIME | खुनी हल्लाप्रकरणी दुसरा संशयित अटकेत

संशयित रिकीला पाच दिवस कोठडी; हल्ला पूर्ववैमनस्यातूनच झाल्याचा कयास

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव : गुंड अन्वर शेख याच्यावरील खुनी हल्ल्याप्रकरणी फातोर्डा पोलिसांनी अटक केलेल्या संशयित रिकी होर्णेकर याला न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर या प्रकरणी फातोर्डा पोलिसांनी खारेबांध येथील विपुल पट्टारी या दुसऱ्या संशयितालाही अटक केली आहे. हा हल्ला वाळू व्यवसायातील चढाओढीतून झाल्याची चर्चा असली तरी अन्वर शेखवरील हल्ला हा पूर्ववैमनस्यातूनच करण्यात आलेला आहे, अशी माहिती दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांनी दिली.

हेही वाचाः खळबळजनक! जीवघेण्या हल्ल्यात कुख्यात गुंड टायगर गंभीर जखमी

रिकी आणि अन्वर यांच्यात सुरू होते वैर

हल्ल्याची ही घटना आर्ले सर्कलजवळ मंगळवारी घडली होती. फातोर्डा पोलिसांनी संशयित पट्टारी याला अटक करून रात्री वैद्यकीय तपासणीसाठी नेले होते. गुंड अन्वरच्याच टोळीतील सदस्य असलेला रिकी हा दोन वर्षांपूर्वी त्याच्यापासून अलग झाला होता. तेव्हापासून रिकी व अन्वर यांच्यात वैर सुरू होते. अपहरण प्रकरणात अन्वर कर्नाटकात लपून बसल्याची माहिती रिकीनेच दिल्याचा संशयही अन्वरला होता. यामुळे दोघांतील वैमनस्यात आणखी वाढ झाली होती. त्यामुळे मंगळवारी दुपारी अन्वरला मारण्याच्या उद्देशानेच रिकी व त्याच्या साथीदारांनी हल्ला केला होता.

ड्रग्ज प्रकरणातूनच हल्ला झाल्याचा संशय

या प्रकरणातील बहुतेक सर्व संशयितांवर अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी व विक्री प्रकरणी गुन्हे नोंद असल्याने हा हल्ला ड्रग्ज प्रकरणातूनच झाल्याचा संशयही बळावला आहे. तर कुडचडे, सावर्डे परिसरातील बेकायदेशीर सुरू असलेल्या वाळू उपसा व वाहतुकीच्या व्यवसायात अन्वर आपले पाय रोवू पाहत असल्यानेच हा खुनी हल्ला करण्यात आल्याचीही चर्चा आहे. अन्वर शेखवरील खुनी हल्ल्यामागील उद्देशाबाबत दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक पंकजकुमार सिंग यांना विचारणा केली असता दोन्ही गटात असलेल्या पूर्वीच्या वैमनस्यातूनच हा हल्ल्याचा प्रकार घडला असल्याचे त्यांनी सांगितले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!