निवडणुकीच्या दोन महिने आधी काँग्रेस उमेदवारांची घोषणा

प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची ग्वाही

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: राज्यातील युतीचा निर्णय हा जनतेच्या निर्णयावर अवलंबून असेल. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ नेत्यांना आपलं मत कळवलं आहे. काँग्रेस नेते पी. चिंदबरम हे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात येत आहेत. गोव्यासाठी चांगला असेल तो निर्णय पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून घेण्यात येईल. आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू करण्यात आली आहे. निवडणुकांच्या दोन महिनेआधी काँग्रेसकडून उमेदवार घोषित करण्यात येतील, अशी ग्वाही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिली.

हेही वाचाः काबूल विमानतळावर चेंगराचेंगरी; सात जणांचा मृत्यू

त्यानंतरच युतीचा निर्णय होईल

आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसच्या तयारीबाबत विचारणा केली असता, प्रदेशाध्यक्ष चोडणकर यांनी विविध भागांतील गट समितींशी चर्चा करण्यात येत असल्याचं सांगितलं. विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यासह गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव हे लोकांची, कार्यकर्त्यांची मते जाणून घेतील, त्यानंतरच युतीचा निर्णय होईल.

काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या एकाही आमदाराला पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश नाही

काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेलेल्या एकाही आमदाराला पुन्हा काँग्रेसमध्ये घेतलं जाणार नाही. त्या दहा आमदारांना कुठल्या पक्षाने घेतल्यास त्या पक्षाशी युती केली जाऊ नये, असं आपलं मत आहे. फातोर्डातील भाजपमध्ये गेलेले कार्यकर्ते हे आधीच दामू नाईक यांच्या संपर्कात होते. त्यामुळे ते भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसला फरक पडत नाही, असंही चोडणकर म्हणाले.

हेही वाचाः सिद्धी नाईकच्या मृत्यूप्रकरणी ‘लव्ह ट्रॅन्गल’चा पोलिसांकडून शोध

लोकांची पसंती असलेल्यांनाच उमेदवारी

काँग्रेसकडे प्रत्येक मतदारसंघात जास्त इच्छुक असले तरी लोकांना हवा असलेल्याच उमेदवाराला तिकीट दिले जाईल. यावेळी वरिष्ठ स्तरावरुन गोव्यावर जास्त लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गोव्यात काँग्रेसचे सरकार होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. अनेक नेते, कार्यकर्ते काँग्रेसकडे येत आहेत, हे चांगलं लक्षण आहे, असं चोडणकर म्हणाले.

हेही वाचाः देशात दोन लाख आयसीयू बेड तयार ठेवा

दिनेश राव आजपासून तीन दिवस गोव्यात

काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव सोमवार, २३ ऑगस्ट रोजी गोव्यात येत आहेत. तीन दिवस त्यांचा राज्यातील विविध मतदारसंघांत कार्यक्रम होणार आहे. या काळात ते पक्षातील नेत्यांसह कार्यकर्त्यांच्या बैठका घेणार आहेत. निवडणूक निरीक्षक पी. चिदंबरम् २५ रोजी गोव्यात येणार आहेत. त्यापूर्वी दिनेश रावांचा हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

हा व्हिडिओ पहाः Corona Vaccine | Vacciation | झायडस कॅडिलाच्या ‘जॉयकोव्ह-डी’ लसीला परवानगी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!