गोवा शिख युवकांचा आदर्श उपक्रम

कोरोना महामारीच्या काळात गोवा शिख यूथ असोसिएशनकडून गरजवंतांना अन्नदान

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः कोरोनामुळे उपासमारीची वेळ आलेल्या कामगार तसंच जीएमसीतील कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी गोव्यातील शिखांची युवा संघटना (गोवा शिख यूथ असोसिएशन) पुढे आली आहे. काही शेकड्यांवरून त्यांचा भार हजारांवर पोहोचलाय. सध्या जीएमसीच्या बाहेर जेवणाची गाडी घेऊन संघटनेचे युवा कार्यकर्ते थांबतायत…उद्देश एकच, महामारीत कुणीच उपाशीपोटी झोपू नये.

शिख युवा संघटनेकडून जनसेवा

कोविडमुळे जगात हाहाकार माजलाय. रोज असंख्य लोक मरतायत. कामधंद्या नसल्यानं बऱ्याच लोकांवर उपाशी पोटी राहण्याची वेळ येतेय. हॉस्पिटल्समधील परिस्थिती तर सांगण्यासारखी नाही. हॉस्पिटलमधील कोविड रुग्णाचं ठीक, हॉस्पिटलकडून त्याच्या खाणा-जेवणासोबत औषध-पाण्याची काळजी घेतली जाते, पण रुग्णासोबत हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या त्याच्या नातेवाईकांची मात्र परवड होते. कोविडच्या भीतीने त्यांच्यासाठी कुणी डबाही घेऊन येत नाही. अशाच लोकांच्या मदतीसाठी धावलीये गोव्यातील शिखांची युवा संघटना. आम्ही अमूक एका हॉस्पिटलमध्ये आहोत. आम्हाला डबा हवाय. तुम्ही देऊ शकाल का, असं म्हणून अनेकांनी आमच्या संघटनेशी संपर्क करून जेवण पुरवण्याची विनंत केली. आणि आम्ही तयार झालो, गोव्यातील शिख युवा संघटनेचे करण सिंग म्हणाले.

2017 मध्ये संघटनेची स्थापना

2017 मध्ये संदीप सरताज गिल, करण सिंग, जगजीत सिंग, दीप सिंग, जगदीप खैरा, झीनत सोनी, गुलाब सिंग आणि स्नेहा गिल यांनी मिळून गोवा शिख यूथ असोसिएशनची स्थापना केली. ‘मानवजातीला सेवा देणं’ हे एकमेव ब्रीदवाक्य घेऊन ही संघटना आज कोविड महामारीच्या काळात काम करतेय.

गरजवंतांना अन्नदान

2020 मध्ये देशात कोविड महामारीला सुरुवात झाल्यापासून गोवा शिख युवा समुदायाने राज्यातील मुळगाव, थिवी स्टेशन, म्हापसा, पणजी, आसगाव, अस्नोडा, ओल्ड गोवा, बांबोळी, मिरामार, ताळगाव, नेरुळ, मेरशी आणि इतर अनेक भागात अडकून पडलेल्या सुमारे 400 लोकांना दरदिवशी दोन वेळेचं अन्न देऊन त्यांची मदत केली. आणि तेव्हापासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आजपर्यंत सुरू आहे. पणजीतील सांताक्रुज भागात ग्रीन व्हॅली इथे सध्या या संघटनेचं काम सुरू आहे. इथे जेवण तयार झाल्यानंतर बांबोळी तसंच जिथून मदत मागितली जाईल तिथे जाऊन हे जेवण गरजूंना दिलं जातंय.

पौष्टिक अन्न पुरवण्यावर भर

जे अन्न पुरवलं जातं ते पौष्टिक असावं यावर संघटनेकडून भर दिला जातो. त्यामुळे जेवणात प्रामुख्यानं सर्व प्रकारच्या डाळी, तांदूळ, बटाट्याची कढी, जिरा राईस, मिक्स भाज्या, भातासह दही कढी अशा सगळ्या पौष्टिक शाकाहारी खाद्यपदार्थांचा समावेश आहे. जेवण तयार झाल्यानंतर ते पूर्ण काळजीपूर्वक कंटेनरमध्ये पॅक करून गरजूंपर्यंत पोहोचवलं जातं. या संघटनेकडून दिवसाकाठी 400 किलोचा भात आणि कमीत कमी 200 किलोची डाळ त्याव्यतिरिक्त भाजी बनवली जाते. हे सगळं ते सहकाऱ्यांच्या बिनशर्त पाठिंब्याने आणि मदतीने तयार करतात. शिवाय, काही विशिष्ट कुटुंबांना त्यांच्या गरजेनुसार किराणासामानही ही संघटना पुरवतेय.

अनेक दात्यांकडून आर्थिक पाठबळ

सुरुवातीला संघटनेच्या सदस्यांनी स्वत:च्या खिशातून पैसे गुंतवून या कामाची सुरुवात केली. पण हळूहळू त्यांच्या कामाला गती मिळाल्यामुळे त्यांना बिग डॅडी कॅसिनो, वेदांत, रोटरी क्लब, राऊंड टेबल क्लब, बीएनआय चॅप्टर, पिंटो व्हिला हाऊसिंग सोसायटी अशा असंख्य दात्यांकडून आर्थिक पाठबळ मिळालं.

कुणीच उपाशी पोटी झोपू नये

अन्नदान करताना किंवा जेवण तयार करताना संघटनेकडून सरकारने घालून दिलेल्या कोविड-19 नियमावलीचं पालन केलं जातंय. हातमोजे, मास्क वापरून तसंच स्वच्छतेची काळजी घेऊन ही संघटना जेवण तयार करतेय. कोविड-19च्या रुपात देशावर मोठं संकट ओढवलंय. या संकट काळात एकच इच्छा आहे की गोव्यात कुणीच उपाशी पोटी झोपू नये. अन् म्हणून आमची संघटना निःस्वार्थपणे गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मैदानात उतरलीये, असं संघटनेचे सदस्य करण सिंग म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!