बार्ज उद्योजकाला लुटण्याचा प्रयत्न फसला

Goan Varta Live | प्रतिनिधी
वास्को: दाबोळी येथील बार्ज व्यावसायिक प्रमोद देसाई (६५) यांच्या घरात घुसून त्यांना बांधून ठेवून दरोडा घेतल्याप्रकरणी पोलिसांनी विशाल आहुजा या तिसऱ्या संशयिताला शनिवारी सकाळी ६.३० वा. पणजीतील कॅसिनोजवळून अटक केली. याप्रकरणी उल्हासनगर-ठाणे (महाराष्ट्र) येथील सुनील मोरे व सूरज मारुती कांबळी यांना शुक्रवारीच अटक केली आहे. दरम्यान, या टोळीचा म्होरक्या डॉ. संजय वर्मा याचा शोध जारी आहे. दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक पंकज सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचाः मोठी बातमी! पालिका आरक्षावरुन दिलेल्या हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
हेही पहाः Travel Crime | प्रवाशांच्या जिवाशी खेळ करत सुरु आहे खासगी बस चालकांचा धंदा
दरोड्याचा सूत्रधार देसाईंच्या ओळखीचा
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देसाई हे दाबोळीतील फातिमा कॉलनीत राहतात. कॉलनीपासून जवळच त्यांचं हॉटेल आहे. साधारण सहा-सात दिवसांपूर्वी डॉ. वर्मा हा त्यांच्या हॉटेलमध्ये उतरला होता. हॉटेलमध्ये खोलीचं आरक्षण करताना त्याने देसाई यांच्याशी मैत्री केली. तसंच गोव्यात विविध ठिकाणी आयुर्वेदिक शिबिरं घेणार असल्याचं त्यानं सांगितलं होतं. त्यानंतर दोन दिवस डॉ. वर्मा हॉटेलमध्ये आलाच नाही. देसाई यांनी चौकशी केली असता, त्याने शिबिरे घेत असल्याचं सांगितले होतं.
एक कोटी रुपयांची मागणी
पोलिस तक्रारीनुसार, शुक्रवारी दुपारी अचानक डॉ. वर्मा याने देसाई यांना फोन केला व भेटण्यासाठी घरी येत असल्याचं सांगितलं. मात्र, देसाई यांनी घरी ते एकटाच असल्यानं सायंकाळी येण्यास सांगितलं. तरीही डॉ. वर्मा कारने दुपारीच घरी आला. त्याच्यासोबत आणखी तिघेजण होते. बंगल्यात शिरताच त्यांनी देसाई यांचे हातपाय बांधले आणि एक कोटी रुपये देण्याची मागणी केली. मात्र, तेवढे पैसे नसल्याचे देसाई यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांनी घरातील किमती वस्तू देण्यास सांगितलं व त्यांच्याकडून ७ हजार रुपयांची रोकड आणि १ लाख २० हजार रुपयांचा मोबाईल घेतला. तसंच चार धनादेशांवर बळजबरी स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यांच्या क्रेडिट कार्डचा गुप्त क्रमांकही घेतला. हा ऐवज घेतल्यानंतर तिघेजण बाहेर पडले व एकट्याला त्यांच्या पाळतीवर ठेवलं होतं.
हेही वाचाः देशात पणजी शहर राहणीमानात अव्वल!
हेही पहाः POLITICS | डिचोलीतील सहा उमेदवारांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश
कर्मचारी फयादमुळे सापडला संशयित
वरील घटनेच्या वेळी हॉटेल कर्मचारी फयाद कुंदगोळे घटनास्थळी आला. त्याने पाळत ठेवणाऱ्या संशयिताकडे देसाईंची चौकशी केली. तेव्हा त्याने आत बैठक सुरू असल्याचं सांगितलं. त्यामुळे फयादला संशय आला. त्याने आजूबाजूच्या लोकांना तातडीने बोलावून पाळत ठेवणाऱ्या संशयितास पकडून ठेवलं. त्यानंतर देसाई यांच्या पत्नीने गस्तीवरील पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तातडीने फातिमा कॉलनीत येऊन त्या संशयिताला पकडलं चौकशी केली असता, त्याचं नाव सुनील मोरे असल्याचं उघड झालं. दरम्यान, हा सर्व प्रकार विचित्र वाटत असला तरी त्यामागे काहीतरी व्यवहार दडलेले असण्याची शक्यता आहे. वास्को पोलिसांनी या प्रकरणी सध्या दरोड्याचा गुन्हा नोंद केला आहे. संशयितांकडून चोरीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.

पोलिसांची जलद कामगिरी
संशयित सुनील मोरेच्या चौकशीनंतर अन्य तिघांना पकडण्यासाठी पोलिस निरीक्षक नीलेश राणे यांनी विविध पथकं तयार केली. शोधकामाला आरंभ झाल्यावर शुक्रवारी सायंकाळी सूरज कांबळी याला पणजी बसस्थानकावरून पकडण्यात आलं. तो बसने मुंबईला जाण्याच्या तयारीत होता. सूरज कांबळीकडे चौकशी केली असता त्याने इतर संशयितांची माहिती दिली. त्या माहितीच्या आधारे शोध घेतला असता, शनिवारी सकाळी साडेसहा वाजता तिसरा संशयित विशाल आहुजा हा पणजीच्या एका कॅसिनोजवळ सापडला.