वास्कोत डेंग्यूमुळे नागरिकांत भीतीचं वातावरण

औषधांची फवारणी, जागृतीवर भर देण्याचे नगराध्यक्षांचे आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

वास्को: कोविड रुग्णसंख्या कमी होत असताना वास्कोत आता डेंग्यूने डोकं वर काढलं आहे. वास्को आरोग्य केंद्राने डेंग्यूसंबंधी जागृती करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. प्रभाग क्रमांक २०मध्ये तीन-चारजणांना डेंग्यू झाल्याचं वृत्त पसरल्याने भीतीचं वातावरण आहे. याप्रकरणी जागृती आणि स्वच्छता मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचं नगरसेवक यतीन कामुर्लेकर यांनी स्पष्ट केलं. डासांना पिटाळून लावण्यासाठी प्रत्येक प्रभागात धूर सोडण्याचं काम तसंच जंतुनाशक औषधाची फवारणी सुरू करण्यात येणार आहे. लोकांमध्ये डेंग्युसंबंधी जागृती करण्याचं काम हाती घेण्यात येणार असल्याचं नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी सांगितलं.

हेही वाचाः सरकारी कर्मचाऱ्यांसाठीची गृहकर्ज योजना; सरकारी आदेशाला खंडपीठात आव्हान

जंतूनाशकाची फवारणीवर भर

ऑगस्ट २०१९मध्ये येथे एका २१ वर्षाच्या युवकाचे डेंग्यूने निधन झाल्यावर रहिवाशांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर संबंधितांनी हालचाली सुरू केल्या होत्या. जागृतीसाठी धावपळ सुरू झाली होती. गेल्या वर्षी करोना महामारीमुळे डेंग्यू रुग्णांबद्दल आवाज झाला नाही. यंदा कोविड महामारीची भीती थोडी कमी होत असतानाच येथे डेंग्यूने लोकांची भीती वाढवली आहे. या प्रकरणाची दखल घेताना कामुर्लेकर यांनी मंगळवारी सकाळी वास्को आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रश्मी खांडेपारकर आणि इतरांच्या सहकार्याने प्रभाक क्रमांक वीसमध्ये पाहणी केली. त्यावेळी काही घरांतील वस्तूंमध्ये जमा पाण्यामध्ये डासांच्या अळ्या तयार झाल्याचं दिसून आलं. डेंग्यू होऊ नये यासाठी कोणती खबरदारी घ्यावी यासंबंधी मार्गदर्शन करण्यात आले. पुढील चार दिवसांमध्ये तेथे जंतूनाशकाची फवारणी करण्यात येणार आहे. यासंबंधी नगराध्यक्ष कासकर व मुख्याधिकारी जयंत तारी यांना माहिती देण्यात आल्याचे कामुर्लेकर यांनी सांगितलं.

हेही वाचाः विदेशी युवतीची पुन्हा स्थानबद्धता केंद्रात रवानगी

डेंग्यूबाबत पालिका गंभीर : नगराध्यक्ष

डेंग्यूसंबंधी आम्ही गंभीर आहोत. जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यासाठी औषधे खरेदी करण्यासंबंधी आपण मुख्याधिकाऱ्यांशी बोललो आहे. प्रत्येक प्रभागात संबंधित नगरसेवकांनी लक्ष द्यावं. तेथे जंतुनाशक औषधाची फवारणी करून घ्यावी. डासांना पिटाळून लावण्यासाठी सायंकाळच्या वेळेत धूर सोडण्यात येणार आहे, असं नगराध्यक्ष दामोदर कासकर यांनी सांगितलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!