गोव्याशेजारी असलेल्या सिंधुदुर्गात अमित शहा ६ तारखेला येणार, गोव्यातही हजेरी लावणार?

कोकण दौरा अखेर निश्चित

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य अमित शहा 6 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील कोकण दौर्‍यावर येणार आहेत. शाह सिंधुदुर्ग येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यक्रमात भाग घेणार आहेत. भाजपचे खासदार नारायण राणे यांच्या प्रयत्नातून साकारलेल्या वैद्यकीय महाविद्यालाचं शहांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आतापर्यंत दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी चळवळीमुळे हा दौरा अनिश्चित मानला जात होता. मात्र आता यावर शिक्कामोर्तब झालंय.

स्वत: अमित शहा यांनी 6 फेब्रुवारी रोजी हा कोकण दौरा निश्चित केला आहे. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकर हेदेखील सहभागी होणार आहेत. या भेटीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील राजकीय तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यताय.

राणेंनी भाजपाचे वर्चस्व वाढवले

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालामध्ये भारतीय जनता पक्षाने सिंधुदुर्गसह कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये चांगला विजय मिळविलाय. नारायण राणेंच्या नेतृत्वामुळे भाजपने शिवसेनेला मागे टाकत आपला विजय नोंदवल्याची चर्चाय. या विजयानंतर नारायण राणे यांच्यावर अमित शहा बर्‍यापैकी खूश झाले असल्याचीही चर्चा सुरु आहे.

कोकणात शिवसेना कमकुवत

पंचायत निवडणुकीत कोकणातील अनेक भागात शिवसेना कमकुवत झाली आहे. ही बाब स्वत: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मान्य केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातही कॉंग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. मात्र, कोकणात अनेक ठिकाणी पक्षाचा पराभव हा कसा विजय मिळवायचा याचा विचार केला जाईल असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

गोव्यातही येणार?

दरम्यान, गोव्याच्या अगदी शेजारी असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असल्याचं अमित शहा गोव्यातही हजेरी लावणार का, याकडेही सगळ्यांची नजर असणार आहे. मात्र अजूनपर्यंत याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे अमित शहा गोव्यात येतात, हे पाहणं महत्त्वाचंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!