दारूही पकडली आणि पायलटही ; १७ लाख ९८ हजारांचा मुद्देमाल जप्त !

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली पथकानं नेमळे फाट्यानजीक केली कारवाई

Goan Varta Live | प्रतिनिधी

बांदा : राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली पथकाने गोव्याच्या मद्याची वाहतुक करत असलेल्या टेम्पोसह एकूण सुमारे १७ लाख ९८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर नेमळे फाटा येथे २२ मे रोजी ४ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत गोवा विदेशी मद्याचे विविध ब्रॅन्डचे १६० बॉक्स मिळून ५ लाख ७६ हजार रुपयांचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे सिंधुदुर्ग विभागाचे अधिक्षक डॉ. बी. एच. तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शैलेन्द्र चव्हाण, जवान रमेश चंदुरे, शरद साळुंखे व जवान निवा चालक संदिप कदम व शिवशंकर मुपडे यांनी केली.

गोपनीय खबर मिळाल्यानं पोलिस सतर्क

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात चोरटी दारु वाहतुक होत असल्याची गोपनीय खबर राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली या पथकाला मिळाली होती. गोव्याहून कुडाळच्या दिशेने जाणाऱ्या संशयीत वाहनांची तपासणी व गस्त घालत असताना पथकाने कुडाळच्या दिशेने जाणारा पांढऱ्या रंगाचा टाटा ई एस टेम्पो क्र. एम. एच ०४-एफ पी-६७८२ संशयीत वाटल्याने तपासणीसाठी थांबवला. सदर वाहनाची तपासणी केली असता गोवा विदेशी मद्याचे विविध ब्रॅन्डचे १६० बॉक्स आढळले. मद्याची एकुण किंमत ५ लाख ७६ हजार रुपये इतकी होती.

पायलटींगसाठीही होती वाहने

यात वापरण्यात आलेला पांढऱ्या रंगाचा टाटा ई एस टेम्पो क्र.एम.एच-०४-एफ पी ६७८२ व टेम्पोला मोबाईलद्वारे संभाषण करुन रस्त्यावर अधिकारी तसेच सरकारी वाहने आहेत किंवा नाहीत याची पाहणी करीत मार्गदर्शनासाठी वापरलेली सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार पुढे व पाठीमागे नंबर प्लेट नसलेली व पायलटींगसाठी वापरलेली सुमारे १२ लाख किंमतीची दोन चारचाकी वाहने ५ लाख ७६ हजार रुपयांचे विदेशी मद्य इतर मुद्देमाल सुमारे २२ हजार रुपये असा एकूण अंदाजे १७ लाख ९८ हजार एवढ्या किंमतीचा मुद्देमाल दोन वाहनासह जप्त करण्यात आला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!