म्हादईविषयी गोवा सरकारचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरतील!

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचे विधान

Goan Varta Live | प्रतिनिधी

बेळगाव : म्हादई प्रकल्पाबाबत कर्नाटक सरकारला मंजुरी मिळू नये म्हणून गोवा सरकार जी धडपड करत आहे, त्याला कधीच यश येणार नाही. कारण कर्नाटक सरकारने नियमांप्रमाणे डीपीआरला मंजुरी घेतली आहे, असे विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी केले आहे.

म्हादईसंदर्भात गोव्यातील सर्व पक्षांच्या आमदारांचा समावेश असलेली सभागृह समिती सातत्याने पाठपुरावा करणार आहे. आता महाराष्ट्र सरकारचीही आम्हाला साथ मिळाल्याने आमची बाजू आणखी बळकट झाली आहे. त्यामुळे म्हादईची लढाई आम्हीच जिंकणार, असा निर्धार गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारीच व्यक्त केला होता. त्याला बोम्मई यांनी सोमवारी लगेच प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचाः ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर सरकारकडून अन्यायः विजय सरदेसाई

म्हादई जलतंटा लवादाने तब्बल दशकभर सुनावण्या घेतल्यानंतर अंतिम निवाडा देताना नदीच्या पाण्याचे वाटप केले आहे. त्याच निवाड्याप्रमाणे आम्ही आमच्या वाट्याचे पाणी वळवत आहे. केंद्रीय जल आयोगानेही सर्व बाजूंची तपासणी करूनच कळसा भांडुरा प्रकल्पाविषयीचा कर्नाटकचा डीपीआर मंजूर केला आहे. त्यामुळे गोवा सरकारने काहीही केले तरी त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरतील. कारण आम्ही लवादाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार प्रकल्पाचे काम करत आहोत, असेही मुख्यमंत्री बोम्मई यांनी म्हटले आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!