आताच अलर्ट व्हा! किनाऱ्याचा रंग बदलण्यामागचं धक्कादायक सत्य!

किनाऱ्याचं निळं पाणी धोकादायक का समजलं जातं?

सिध्देश सावंत | प्रतिनिधी

ब्युरो : गोव्यातील अत्यंत निसर्गरम्य परिसर म्हणून ज्याला ओळखले जाते त्या काणकोण परिसरातील समुद्राचे निळे पाणी अकस्मात हिरवे झालं होतं. त्यामुळे स्थानिकांमध्ये आश्चर्य पसरलेले. या अचानक झालेल्या बदलाने पर्यटकांनीही इथल्या समुद्र किनाऱ्याकडे पाठ फिरवली.

सुरुवातीला हा प्रकार केवळ आगोंद येथे आढळून आला होता. त्यानंतर पालोळे, पाटणे, कोळंब, राजबाग या ठिकाणीही असा प्रकार दिसून आला. मागच्या कित्येक वर्षात प्रथमच असा प्रकार आपण पाहिल्याचे स्थानिक नागरसेवक दिवाकर पागी यांनी सांगितले. या पाण्याला कुजका वास येत असल्यामुळे पर्यटकांनीही किनाऱ्याकडे पाठ फिरवली. मात्र कालपासून हे पाणी निवळू लागले आहे अशी माहिती सायमन रिबेलो या अन्य एका व्यावसायिकाने दिली.

फक्त राज्यातच नव्हे तर राज्याशेजारी सिंधुदुर्गातील किनाऱ्यांवरही असाच प्रकार दिसून आला होता. रत्नागिरी आणि कुणकेश्वर किनाऱ्याचे काही फोटो समोर आलेत. या फोटोमुळे चिंता व्यक्त केली जाते आहे. याच संदर्भात रत्नागिरीचे सचिन देसाई यांनी एक फेसबूक पोस्ट लिहून चिंता व्यक्त केली आहे.

सचिन देसाई यांनी काय म्हटलंय?

रत्नागिरी च्या निळ्या लाटांमागील सत्य…काहीतरी आकर्षक दाखवत निसर्ग तुमचं लक्ष वेधतोय. तुम्हाला अलर्ट करतोय.

रत्नागिरी च्या निळ्या लाटांमागील सत्य…काहीतरी आकर्षक दाखवत निसर्ग तुमचं लक्ष वेधतोय….तुम्हाला अलर्ट करतोय…. गेले…

Posted by Sachin Desai on Saturday, 5 December 2020

गेले काही दिवस रत्नागिरी चे किनारे खास बनले आहेत. रात्रीच्या वेळी किनाऱ्यावर दिसणाऱ्या निळ्या लाटा प्रत्येकाच्या आकर्षणाचा विषय ठरत आहेत…रत्नागिरी च्या किनाऱ्यावर निळ्या लाटा पहाण्यासाठी रोज रात्री लोकांची गर्दी होतेय. केवळ रत्नागिरीच नाही तर नाशिक अहमदनगर पासून अनेक मंडळी या लाटा पहाण्यासाठी शहरात आली आहेत. या लाटांच्या निमित्ताने अनेक पर्यटकांनी रत्नागिरीची टूर प्लॅन केलेय. गेले तीन दिवस रत्नागिरी च्या आरेवारे च्या समुद्र किनाऱ्यावर या लाटा पहायला मिळत आहेत.

या लाटा डोळ्यांनी दिसायला जितक्या आकर्षक आहेत त्याहून अधिक कठीण त्यांना कॅमेरामध्ये पकडणे आहे. रात्रीच्या मिट्ट अंधारात या लाटांना टिपण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. पण गेले काही दिवस रत्नागिरीचे हौशी फोटोग्राफर सिद्धेश वैद्य, सुशिल कदम, नेत्रा पालकर, प्रसाद शिवगण यांनी या चमकणाऱ्या लाटांची छायाचित्रे अचूक टिपली आहेत.

का चमकत आहेत किनाऱ्यावरील या लाटा? याविषयी प्रत्येकाच्या मनात उत्सुकता आहे. आणि त्याची उत्तरे जेष्ठ सागरी जीव अभ्यासक प्रा. स्वप्नजा मोहिते यांनी समोर ठेवली आहेत.

“नॉकटील्युका हा एकपेशीय डायनोफ्लॅजेलेट गटात मोडणारा प्राणी प्लवंग आहे. डोळ्यांनी दिसू शकणारा हा सूक्ष्मजीव आपल्या शरीरातून काजव्यासारखा जैविक प्रकाश निर्माण करू शकतो. खळबळणाऱ्या, उसळणाऱ्या लाटांमुळे हे प्राणी उद्दीपित होतात आणि या निळसर प्रकाशाने चमकू लागतात. नॉकटील्युका सिंटीलांस या शास्त्रीय नावाने ओळखला जाणारा हा प्राणी सध्या समुद्रात दिसणाऱ्या निऑन लाईट्स सारख्या हिरव्या निळ्या प्रकाशाने चर्चेत आला आहे आणि समुद्राला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या आकर्षणचा विषय बनला आहे. सी स्पार्कल म्ह्णूनही तो ओळखला जातो. सध्या जगभर या प्राण्यावर संशोधन केले जात आहे ते त्याच्या थंडीमध्ये अचानक येणाऱ्या विंटर ब्लूम्समुळे!”

उत्तर अरेबियन समुद्र ते अरेबियन पेनिन्सुला दरम्यान हे प्राणी मोठ्या प्रमाणात सध्या दिसत आहेत. एरवी दिवस लालसर रंगाने दिसणारा हा प्राणी सध्या हिरवट रंगाचा दिसून येत आहे आणि दिवसा पाण्यावर हिरवट शेवाळासारखा थर दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे या प्राण्याने आपल्या शरीरात पेडीमोनाज नॉकटील्युके या शैवाल वर्गीय सजीवांना आसरा दिला आहे. त्यामुळे तो हिरवट दिसतो आणि त्याच्या मदतीने प्रकाश संश्लेषण करून अन्न ही प्राप्त करू शकतो. जलचरांची सूक्ष्म पिल्ले, अंडी यावर उपजीविका करणारा हा प्राणी, म्हणूनच अन्न उपलब्ध नसेल तरीही जगू शकतो. त्यात मोठ्या प्रमाणात साठणाऱ्या अमोनिया मुळे जेलीफिश सोडल्यास इतर कोणी त्याला खात नाहीत. किनाऱ्याकडे सूक्ष्म खाद्याची उपलब्धता आणि वातावरण असल्याने नॉकटील्युकाचे थवे किनारीकडे सरकतात. या ब्लूम्समुळे समुद्रातील डायटम्सच्या प्रमाणात मात्र लक्षणीय घाट झाली आहे. हे खूप चिंतेचे आहे. कारण डायटम्स हे वनस्पती प्लवंग समुद्रातील प्राथमिक उत्पादक आहेत आणि समुद्रातील जैव साखळी ही या प्लवंगावर अवलंबून असते.

पण अचानक या प्राण्याच्या संख्येत अशी प्रचंड वाढ का झाली असावी हा संशोधनाचा विषय आहे. यामध्ये २ कारणांचा उल्लेख करावा लागेल. त्यात समुद्राच्या पाण्यात कमी झालेला ऑक्सिजन आणि कार्बन डाय ऑक्साईडचे वाढलेले प्रमाण, हिमालयन तिबेटीयन पठारावरील ग्लेशियर्सचे कमी होत जाणारे प्रमाण आणि त्यामुळे तेथून येणाऱ्या थंड वाऱ्यांवर झालेला परिणाम ही कारणे प्रामुख्याने समोर येत आहेत. नॉकटील्युका हा कमी ऑक्सिजन असलेल्या वातावरणातही राहू शकतो. त्याच्या शरीरातील शैवाल पेशी कार्बन डाय ऑक्साईडच्या मदतीने प्रकाश संश्लेषण करून अन्न निर्मिती करू शकतात.

दुसरे कारण हे अप्रत्यक्षरीत्या नॉकटील्युकाला मदत करते. ग्लेशियर्सवरून येणारे थंड वारे उत्तर अरबी समुद्राच्या पृष्ठभागाचे पाणी थंड करतात आणि हे थंड पाणी जड होऊन समुद्र तळाशी जाते. त्यामुळे तेथील काहीसे गरम आणि पोषक घटकांनी युक्त असे पाणी वर येत. ही अपवेलींगची क्रिया पाण्यातील पोषक आणि उपयुक्त घटक थरांमध्ये मिसळण्याची प्रक्रिया घडवून आणते. पण ग्लेशियर्स कमी होत असल्याने हे गार वारे आणि त्यामुळे होणारी ही अपवेलींगची प्रक्रिया यात घट होत आहे. ही परिस्थिती इतर प्लवंगांपेक्षा नॉकटील्युकाला फायदेशीर ठरते. इतर खाद्य नसतानाही हा प्राणी त्याच्या शरीरातील शेवाळाच्या पेशींच्या मदतीने वर्षभरही जगू शकतो.

सध्या जगभरात, विशेषतः समशीतोष्ण कटिबंधातील समुद्रात ह्या ब्लूम्स आढळत आहेत. याचा संबंध समुद्रातील अन्न साखळीशी आहे आणि त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. म्हणूनच यावर संशोधन करण्याची गरज आहे. याच्या सुंदर निळसर प्रकाशात चमकणाऱ्या समुद्राच्या लाटा आपल्याला आकर्षित करतात पण या सौंदर्यामागील कारणांवर विचार करणे महत्वाचे ठरेल.”

या लाटा सध्या जरी आकर्षणाचा विषय ठरत असल्या तरी जगातील पर्यावरणाचा विचार करता हि एक धोक्याची घंटा आहे. प्रदूषण,ऑक्सिजन कमी होणे आणि CO2 ची वाढ वातावरणीय बदल and ग्लोबल वार्मिंग या सगळ्याचा हा एकत्रित परिणाम आहे.काहीतरी आकर्षक दाखवत निसर्ग तुम्हाला सूचना करतोय….

(Coastal megacities in India generate more than 6 billion liters (1.6 billion gallons) of wastewater daily. Overall, the country can treat only about a third of its sewage. That means billions of liters of untreated sewage are being flushed into the Arabian Sea every year.
The water body is believed to host the world’s largest dead zone, where the oxygen concentration is so low it is not conducive to life Report by Central Marine Fisheries Research Institute)

या निळ्या लाटा पहाताना अभ्यासकांनी समोर ठेवलेल्या सत्याकडे डोळेझाक करून हि चालणार नाही. पण सध्या तरी रत्नागिरी च्या किनाऱ्यावर येणारा प्रत्येक जण या लाटा एन्जॉय करतोय….या लाटांनी रत्नागिरी च्या पर्यटनाला एक नवी किनार दिली आहे. ही सारी दृश्य खरोखरंच अद्भूत आहेत….निसर्गाची हि विलोभनीय करणी अनुभवायला रत्नागिरी च्या किनाऱ्यावर यायला हवं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!