विमानतळ केवळ विमाने उडण्यासाठी नव्हे

मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत; विमानतळाच्या माध्यमातून लोकांना विकास करण्याचे उद्दिष्ट

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः विमानतळ प्रकल्प केवळ विमाने उडवण्यासाठी नव्हे तर गावचा, तालुक्याचा, पर्यायाने लोकांचा विकास करण्यासाठी उभारला जात आहे. विमानतळासाठी केवळ ५० पन्नास हजार झाडं तोडली, त्याजागी मात्र ५ लाख नवीन झाडं लावण्यात आली आहे. जे एनजीओ या प्रकल्पाच्या विरोधात मोठमोठ्याने गोंधळ घालतात, आवाज उठवतात किंवा स्वतःला पर्यावरण प्रेमी म्हणवतात, त्यांनी स्वतः किती झाडे आजपर्यंत राज्यात लावली असा प्रश्न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. मोपातील कडशी नदीवर जलसिंचन खात्याअंतर्गत ५ कोटी रुपये खर्च करून मोपा पठारावरील झाडांना पाणी पुरवठा करण्याच्या योजनेंतर्गत कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर, जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे बायोडायव्हरसिटीचे सदस्य सचिव प्रदीप सरमुकादम, माजी सरपंच पल्लवी राऊळ, नगराध्यक्ष उषा नागवेकर, माजी सरपंच जयप्रकाश परब, उपजिल्हाधिकारी रविशेखर निपाणीकर, जलसिंचन खात्याचे अधिकारी प्रमोद बदामी, पेडणे भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. मुख्यमंत्री यावेळी बोलताना म्हणाले, झाडांसाठी आता पाण्याची सोय झालीये. कडशी नदीचं पाणी आता उन्हाळ्यात या झाडांना मिळणार आहे. एकूण पाच हेक्टर जमिनीत झाडं लावली जाणार आणि त्यासाठी पाण्याची सोय केली गेली आहे.

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर बोलताना म्हणाले, मोपा विमानतळ हा प्रकल्प लोकांसाठी खेचून आणला आहे. नोकऱ्या जर स्थानिकांना मिळाल्या नाही, तर वेळप्रसंगी आंदोलन करायला मागे पुढे पाहणार नाही. भाजपचे आमदार विकास कामे करण्यासाठी मागे पडणार नाहीत, मात्र सर्वांना सरकारी नोकऱ्या देणं शक्य नाही. मोपा विमानतळामुळे १०० टक्के नोकऱ्या मिळतील, अशी ग्वाही देतो.

मोपा विमानतळ नोकऱ्यासाठी पूर्व प्रशिक्षण

उपमुख्यमंत्री आजगावकर म्हणाले, ज्या नोकऱ्या विमानतळ प्रकल्पात उपलब्ध होणार आहेत, त्यासंबधी पूर्वप्रशिक्षण, वेगवेगळे कोर्सेस कंपनी सुरु करणार आहे आणि १०० टक्के देण्यात येणार आहे.

परत मोपा हरित करूया

जिल्हा पंचायत सदय सीमा खडपे यांनी बोलताना सांगितलं, मोपा विमानतळामुळे बऱ्याच झाडांची कत्तल करावी लागली. मोपा पठारावर झाडे लावल्यानंतर ऑक्टोबर महिन्यानंतर झाडांना पाणी नसतं. त्यामुळे ती झाडे करपतात. आता सरकारतर्फे पाण्याची योजना मार्गी लागल्यानंतर मोपा हरित करुया, असं आवाहन सीमा खडपेंनी केलं.

बायोडायव्हरसिटीचे सदस्य सचिव प्रदीप सरमुकादम बोलताना म्हणाले, पेडणे तालुक्यात जास्तीत जास्त झाडे लावली आहेत. यंदा १२०००० झाडे केवळ पेडणे तालुक्यात नागरिकांनी जैविकविविधता मार्फत वितरीत करून लागवड केलीत. स्थानिक युवकांना प्रोत्साहन देऊन झाडांची नर्सरी तयार करून त्यांच्याकडून ती झाडे घेऊन नागरिकांना दिलीत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!