‘डेल्टा प्लस’ चाचणी प्रयोगशाळा 15 दिवसात न उभारल्यास आंदोलन !

गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांचा इशारा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : इतर राज्यातून गोव्यात प्रवेश करणाऱ्या लोकांची फक्त ॲन्टीजेन चाचणी करुन भाजप सरकार राज्यातील गोरगरीब जनतेचे आयुष्य धोक्यात आणत आहे. डेल्टा प्लस शेजारच्या कोकणात, कर्नाटक आणि केरळमध्ये आधीच पोहोचला आहे. हा विषाणू फक्त जीनोम सिक्वेन्सिंग द्वारे ओळखायला मिळतो. यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील बेजबाबदार भाजपा सरकारने गोव्यात जीनोम चाचणी सुविधा सुरू करण्यासाठी त्वरित पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केलीय.

कोविडच्या दुसर्‍या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे भाजपा सरकारने कोविड रुग्णांची हत्या कशी केली हे संपूर्ण जगाने पाहिले आहे. असंवेदनशील आणि भ्रष्ट भाजप सरकार कमिशनचा वाटा ठरविण्यात व्यस्त राहिले, ज्यामुळे 3००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, असा आरोप गिरीश चोडणकर यांनी केला.

धक्कादायक बाब म्हणजे, दुसर्‍या महासंकटात भीषण परिस्थिती असतानाही भाजपा सरकारचे असंवेदनशील मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना अद्याप याबाबत धडा मिळालेला नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कधीच अस्तित्वात न येणाऱ्या घोषणा करण्यात व्यस्त आहेत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे गेल्या काही दिवसांत बेपत्ता झाले आहेत. तिसऱ्या लाटेचा सामना करायची काहीच तयारी नसल्याने या सरकारचे गैरव्यवस्थापन स्पष्ट दिसत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रॉस घेबेरियसस यांनी असा इशारा दिला आहे की कोविड – 19 महामारीचा हा धोकादायक काळ असून जवळजवळ १०० देशांमध्ये संसर्गजन्य डेल्टा प्रकार आढळून आले आहेत. आमच्या शेजारील राज्यांमध्ये डेल्टा प्लस पोहोचला आहे. या प्रकाराचा प्रसार लवकर ओळखून आणि नियंत्रणाद्वारे नियंत्रित केला जाऊ शकतो. म्हणूनच आपल्याकडे जीनोम सिक्वेंसींग चाचणीसाठी स्वतःची प्रयोगशाळा असायला पाहिजे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आता तरी हे मनावर येऊन लोकांचे प्राण वाचवण्यासाठी काम करावे, असे चोडणकर म्हणाले.

सध्या गोव्यातून नमुने पुण्यात पाठविण्यात येत आहेत. पण त्याचा निकाल लागण्यास अधिक कालावधी लागत आहे. यामुळे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचार्‍यांवर ओझे वाढत आहे आणि परिणामी रुग्णांचे आरोग्य बिघडते, जे जीवघेणे होऊ शकते, असे ते म्हणाले. आम्ही वैद्यकीय तज्ञांकडून जाणून घेतले आहे की संशयित प्रकरणांमध्ये जीनोम सिक्वेंन्सिंग त्वरित केले पाहिजे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तिसर्‍या लाटेच्या तयारीवर बढाई मारताना दिसत आहेत पण काहीही ठोस दिसत नाही, असे चोडणकर म्हणाले.

एक वर्षापूर्वी जीएमसी येथे प्रयोगशाळा स्थापन करण्याचा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा सल्ला भाजपा सरकारने स्वीकारला असता तर अनेकांचे जीव वाचले असते. या प्रयोगशाळेबद्दल जीएमसीला मार्गदर्शन करण्यासाठी आयसीएमआरसी अधिकाऱ्याने गोव्याला भेट दिली होती, पण आरोग्यमंत्र्यांच्या पथकाने त्यांचा अपमान केला आणि त्यांना परत पाठवले होते. आजपर्यंत संपूर्ण चाचणी प्रयोगशाळा का स्थापित केली गेली नाही, हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले पाहिजे, असे गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.

जीएमसीच्या विश्वासार्ह वैद्यकीय तज्ञांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रयोगशाळा नसल्यामुळेच कोविडचे नवीन प्रकार वेळेवर शोधण्यात अयशस्वी झाले, ज्यामुळे हजारो लोकांचे मृत्यू झाले, असे सांगून गिरीश चोडणकर यांनी सांगितले की या प्रयोगशाळेने गेल्या एका वर्षात किमान 1000 लोकांचे जीव वाचवले असते.

येत्या 15 दिवसात ही प्रयोगशाळा स्थापन करा किंवा आमच्या आंदोलनाला सामोरे जा, असा आम्ही सरकारला इशारा देतो. प्रयोगशाळा स्थापना करण्यात अपयशी ठरलो तर पुन्हा एकदा हे सिद्ध होईल की भाजपा सरकारला कोविड रुग्णांचे मारेकरी म्हणून आपली नवीन ओळख पुढे चालू ठेवायची आहे, असेही गिरीश चोडणकर म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!