‘आमची जमीन आमकां जाय’

सत्तरीनंतर आता पेडणेतही भूमिपुत्रांचा उठाव

किशोर नाईक गावकर, संपादक | प्रतिनिधी

पणजी: मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी सुमारे 90 लाख चौ.मीटर जमिन संपादन करूनही आता पुन्हा लिंक रोडच्या निमित्ताने केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्रालयाने भूसंपादन अधिसुचना जारी केल्याने पेडणेतील शेतकरी प्रचंड संतापले आहेत. शेळ-मेळावलीतील आयआयटी विरोधी आंदोलनाने संपूर्ण गोवा हादरवला. चिकाटी, प्रामाणिकपणा आणि संघर्षाच्या बळावर सरकारला नमवलेल्या शेळ- मेळावलीवासीयांकडून प्रेरीत झालेल्या पेडणेकरांनीही आता तोच मार्ग अवलंबिण्याचा निर्धार बनवलाय. मोपा विमानतळ लिंक रोडला जमिन देणार नाही, अशी ठाम भूमिका घेत या लोकांनी आंदोलन सुरू केलंय.

चोडणकर आणि गांवकर यांना अटक

नागझर येथे भूसर्वेक्षणाला विरोध केल्यानंतर येथील सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत चोडणकर आणि अॅड. जितेंद्र गांवकर यांना अटक करण्यात आलीय. सरकारी कामकाजात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. वास्तविक शेळ-मेळावलीप्रमाणेच इथे स्थानिकांचा उठाव होऊ नये यासाठी स्थानिकांना पाठींबा देणाऱ्यांना लक्ष्य बनवण्याचा डाव सरकार खेळत असल्याची टीका गोवा फॉरवर्डचे नेते तथा माजी जिल्हा पंचायत सदस्य दीपक कळंगुटकर यांनी केलीय. चोडणकर आणि गांवकर यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी स्थानिकांनी पेडणे पोलिस स्थानकावर धडक दिली. गोवा कुळ-मुंडकार संघटना, गोवा फॉरवर्डचे नेते तथा माजी आमदार किरण कांदोळकर, म्हापशाचे संजय बर्डे, राजन घाटे यांनी स्थानिकांना पाठींबा दिला.

आमची जमीन आमकां जाय

शेळ-मेळावलीवासियांच्या घोषणा शुक्रवारी पेडणे महालात गुंजल्या. ‘आमची जमीन आमकां जाय’ अशा घोषणांनी पेडणे शहर दुमदुमले. या लोकांनी पेडणेतील दोन्ही आमदारांच्या विरोधातही घोषणा दिल्या. सरकारने शेळ मेळावलीची पुर्नरावृत्ती पेडणेत करू नये, असं आवाहन यावेळी करण्यात आलं. पेडणेतील जमिनीपासून येथील भूमिपुत्रांना दूर करण्याचा डाव सरकार खेळत आहे. मोपाच्या 85 टक्के लोकांना अद्याप भरपाई नाही. कवडीमोल दराने जमिन लाटून लोकांची फसवणूक केलीय. क्रिडानगरीसाठी घेतलेली जमिन भलत्याच कारणासाठी वापरली जातेय. इलेक्ट्रॉनिक सिटी प्रकल्पासाठीही गैरमार्गाने जमिन ताब्यात घेतली. लोकांच्या जमिनींवर सरकारकडूनच दरोडा घातला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. स्वतःला बहुजन समाजाचे सरकार म्हणवून बहुजन समाजाचाच घात करण्याचा करंटेपणा हे सरकार करीत असून आगामी निवडणूकीत या सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!