‘उमर 56 की, वाईफ 33 की’..ब्रिटनच्या पंतप्रधानांची ‘प्रेमाची भानगड’!

..या लग्नाची कुणकुण पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही नव्हती !

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : प्रेम म्हणजे प्रेम असतं, ब्रिटनमध्येही सेम असतं, असंच आता म्हणावं लागेल. कारण, ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी आपलं लग्न गुपचूपरित्या उरकलं असल्याची बातमी वेगाने पसरली आहे. प्रेयसी कॅरी सायमंडसोबत ते लग्नबंधनात अडकले आहेत. हा विवाहसोहळा वेस्टमिन्स्टर कॅथड्रल चर्च येथे पार पडला. द सन आणि मेल या स्थानिक वृत्तपत्रात याबाबतची बातमी देण्यात आली आहे. मात्र जॉनसन यांच्या कार्यालयातून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. कॅथलिक कॅथड्रल चर्च परिसरात दुपारी दीडच्या सुमारास अचानक लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे नक्की काय झालं, हे कुणाला कळलं नाही. त्यानंतर कॅरी सायमंड अर्ध्या तासांनी गाडीतून तिथे पोहोचली. तेव्हा तिने पांढरा शुभ्र, वधुचा ड्रेस परिधान केला होता.

पंतप्रधान बोरिस जॉनसन हे ५६ वर्षांचे तर कॅरी सायमंड या ३३ वर्षांच्या आहेत. जॉनसन पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर २०१९ पासून दोघेही डॉवनिंग स्ट्रीटमधील घरात एकत्र राहात आहेत. गेल्या वर्षी त्यांनी साखरपुडा झाल्याचं जाहीर केलं होतं, तर जुलै २०२२ मध्ये लग्न करणार असल्याची निमंत्रण पत्रिका द सन या वृत्तपत्राने छापली होती. मात्र त्यापूर्वी या दोघांनी लग्न केल्याचं सांगण्यात येत आहे. अगदी शेवटच्या क्षणी काही मोजक्या पाहुण्यांना आमंत्रित केल्याचं स्थानिक वृत्तपत्रात छापण्यात आलं आहे. या लग्नाची कुणकुण पंतप्रधान कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही नव्हती. त्यामुळे त्यांनी लग्न केलं की, नाही याबाबत त्यांनाही माहिती नाही. इंग्लंडमध्ये करोनामुळे लग्नात फक्त ३० लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे.

बोरीस जॉनसन यांचं खासगी आयुष्य खूप गुंतागुंतीचं आहे. लग्नाबाबत खोटी माहिती दिल्याने त्यांची पक्षाच्या धोरण समितीतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांचा दोन वेळा घटस्फोटही झाला आहे. तसेच त्यांना किती मुलं आहेत, याबाबत माहिती देण्यास नकार दिला आहे. जॉनसन यांचा यापूर्वी पेशाने वकील असलेल्या मरीना व्हीलर यांच्याशी विवाह झाला होता. त्यानंतर त्यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये वेगळं होण्याचा निर्णय घेतला होता.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!