शापोरा नदीतील ‘त्या’ जेटीला आगरवाडा – चोपडेवासियांचाही विरोध

गुरुवारी बैठक; जेटीला विरोध करण्यासाठी मांडणार ठराव; कॅप्टन ऑफ पोर्टला सादर करणार

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः शापोरा नदीच्या पात्रात शिवोलीच्या बाजूने होऊ घातलेल्या तरंगत्या जेटीला मार्ना-शिवोली पंचायतीचा विरोध झाल्यानंतर ही जेटी आता चोपडे फेरी धक्क्यावर स्थलांतरित करीत असल्याचं आश्वासन मरीन टेक इंडिया या कंत्राटदार कंपनीचे बिसनेस डेव्हलपमेंट ऑफिसर कॉस्मा डिसोजा यांनी दिले आहे. ही तरंगती जेटी एमपीटीची तर नाही ना, असा संशयही व्यक्त केला जात असल्याने जेटीद्वारे कोळसा वाहतूक तर होणार नाही ना, असा प्रश्न स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत. दोनचार दिवसात या तरंगत्या जेटीची जोडणी पूर्ण झाल्यानंतर ही जेटी आता चोपडे फेरी धक्क्याच्या बाजूला हलवण्यात येणार आहे. त्यामुळे आता चोपडे पंचायतीने या जेटीला विरोध करण्याच्या दृष्टीने पावलं उचलली आहेत. गुरुवारी होणाऱ्या खास बैठकीत तसा ठराव मंजूर करून कॅप्टन ऑफ पोर्टला सादर करण्यात येणार असल्याचं स्थानिक पंच भगीरथ गावकर यांनी सांगितले.

हेही वाचाः CORONA UPDATE | रुग्ण बरे होण्याचा दर 91.40 टक्क्यांवर

आगरवाडा – चोपडेवासियांचा जेटीला विरोध

शिवोलीप्रमाणेच आगरवाडा –चोपडे पंचायतीतील नागरिकांचा या जेटीला तीव्र विरोध आहे. त्यामुळे लोकांचा जर विरोध असेल तर पंचायतीचाही त्याला विरोध असल्याचं गावकर म्हणाले. याबाबत आपण आगरवाडा –चोपडेच्या सरपंच प्रमोदिनी आगरवाडेकर, उपसरपंच समिता राऊत तसंच अन्य सदस्यांना कल्पना दिली असून गुरुवारी होणाऱ्या विशेष बैठकीत या तरंगत्या जेटीविरुद्ध ठराव मंजूर करून नदी परिवहन खात्याला पाठवण्यात येणार असल्याचं ते म्हणाले.

हेही वाचाः बेकायदा घरांना घरपट्टी लागू करण्यासह ती कायदेशीर करावी

जेटीबाबत स्थानिकात संभ्रम

गेल्या पंधरवड्यात शापोरा नदीच्या पात्रात शिवोली –चोपडे पुलाखाली गुडेच्या बाजूने अचानक जेटीची सामुग्री आणून टाकण्यात आली. त्यानंतर या तरंगत्या जेटीचं प्रत्यक्ष काम सुरू झालं. त्यानंतर संभ्रमित झालेल्या मार्ना –शिवोली पंचायतीतील नागरिकांनी पंचायतीकडे संपर्क साधला. पंचायतीने याची दखल घेऊन नियोजित जेटीच्या जागी काही स्थानिक नागरिकांसह भेट देऊन कंत्राटदार कंपनीला जाब विचारला. यावेळी मार्ना-शिवोली पंचायतीच्या सरपंच शर्मिला वेर्णेकर, स्थानिक पंच फ्रेडी फर्नांडिस, विघ्नेश चोडणकर, माजी पंच मुन्नी आगरवाडेकर, स्वामी समर्थ संघटनेचे अध्यक्ष निलेश वेर्णेकर तसंच काही स्थानिक नागरिक उपस्थित होते.

हेही वाचाः कंत्राटी परिचारिकांना सेवेत कायम करा

जेटी त्वरित हटवावी

या जेटीला मार्ना-शिवोली पंचायतीचा विरोध, शिवोलीतील नागरिकांचा या जेटीला विरोध असल्याने पंचायतीचासुद्धा याला विरोध राहील. शापोरा नदी तीरावरील बंधाऱ्याची पूर्णपणे पडझड झाली असताना प्राधान्यक्रमाने सरकारने या बंधाऱ्याचं काम हाती घेऊन शिवोली गावाचं संरक्षण करणं आवश्यक असताना लोकांना नको असलेला हा प्रकल्प का लादावा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. स्थानिकांना हानिकारक असलेली मुरगाव पोर्ट ट्रस्टची जेटी आम्ही कोणत्याही परस्थितीत उभारू देणार नसल्याचं सांगून ही जेटी त्वरित हटवावी, असं सरपंच शर्मिला वेर्णेकर म्हणाल्या.

हेही वाचाः मुंबईला निघालेली गोव्याची दारू बांदा इथं पकडली

जेटीबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावं

जेटीबाबत सरकारने स्पष्टीकरण द्यावं अन्यथा लोकांत याविषयी संभ्रम कायम राहील. शापोरा नदी ही इथल्या पारंपरिक मच्छीमार बांधवांची जीवनदायिनी आहे. या नदीतील मासे, खुबे, तिसरे, कालवा, शिनाने यावर स्थानिकांची उपजीविका चालते. या ठिकाणी जेटी झाल्यास स्थानिकांच्या हक्कावर गदा येणार आहे. त्यांचं उपजीविकेचं साधन नष्ट होणार आहे. त्यासाठी याबाबत स्पष्टीकरण करावं अशी आमची मागणी आहे. सरकारचा जर हा प्रकल्प असता, तर सरकारी प्रतिनिधी असते. हा प्रकल्प खासगी असल्याचा नागरिकांना संशय आहे, असं निलेश वेर्णेकर म्हणाले.

हेही वाचाः 3 जूनपासून 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण सुरू; वाचा कधी कुणाचं लसीकरण

या जेटीचं चोपडेत लवकरच स्थलांतर

केंद्र सरकारच्या निधीतून राज्य सरकार ही जेटी उभारीत असून त्याचा सामाजिक जेटी म्हणून उपयोग करण्यात येणार आहे. त्याचा लाभ स्थानिक नागरिकांबरोबरच मच्छीमार बांधवाना होणार आहे. शिवोलीच्या बाजूने ही जेटी ठेवण्यात येणार नसून चोपडे येथील फेरी धाक्क्याच्या बाजूला स्थलांतरित करण्यात येणार आहे. आता फक्त ही जेटी या ठिकाणी जोडण्यात येईल नंतर ती हलवण्यात येईल. याविषयी कंत्राटदार कंपनीने मार्ना पंचायतीला पत्रही दिलं आहे. सध्या लॉकडाऊनचे दिवस असल्यानं कामगारांची उणीव आहे. त्यामुळे थोडा विलंब लागला. तसंच काम करण्यासाठी भरती ओहोटी बघून काम करावं लागतं. त्यामुळे शिवोलीवासियांनी थोडी कळ सोसावी. दोन-चार दिवसात निश्चितच ही जेटी चोपडेच्या फेरी धक्क्याजवळ स्थलांतरित करण्यात येईल. अशा एकूण पाच जेटी उभारण्यात येणार आहेत. पैकी गोवा राज्याच्या घटक राज्य दिनी रायबंदर येथील जेटीचा शुभारंभ केला, तर कॅप्टन ऑफ पोर्टसतर्फे मांडवी नदीच्या पात्रात पणजी येथे एक जेटी उभारली आहे. आणखीन पणजी येथे जेटी उभारण्यात येणार आहे, असं जेटी उभारण्याचं कंत्राट मिळालेल्या मरीन टेक इंडिया कंपनीचे व्यवसाय विकास अधिकारी कॉस्मा डिसोजा म्हणाले.

हेही वाचाः सरकारने ‘त्या’ दोन लाखांचा हिशोब द्यावा

दरम्यान शिवोली येथे जोडण्यात येणारी ही जेटी चोपडेच्या बाजूने हलवण्यात येणार असल्यानं चोपडेतील नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. चोपडे येथे दोन फेरी धक्के आहेत. त्यातील नेमक्या कुठल्या धक्क्याजवळ ही जेटी उभारण्यात येणार आहे हे स्पष्ट नाही. ही जेटी मुरगाव पोर्ट ट्रस्टची असल्याची चाहूल लागल्यानं या ठिकाणी कोळशाची वाहतूक होणार तर नाही ना, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे. काही युवकांनी आमदार दयानंद सोपटे यांची भेट घेऊन या जेटीला आमचा विरोध असल्याचं सांगितलं. त्यामुळे आमदार सोपटे याबाबत कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!