वर्षानंतर ग्रामसभा मात्र, सरपंच अनुपस्थितीत, काय आहे प्रकरण…

Goan Varta Live | प्रतिनिधी
मडगाव : वर्षभरापेक्षा जास्त कालावधीनंतर माकाझन येथील ग्रामसभा रविवारी सकाळी आयोजित करण्यात आली होती. मात्र, या ग्रामसभेची नोटीस काढणाऱ्या सरपंचांसह उपसरपंचही उपस्थित राहिले नाहीत. गेल्या दहा वर्षांच्या कालावधीत कधीही सरपंच, उपसरपंचांच्या अनुपस्थितीत ग्रामसभा झाली नाही, असे सांगत ग्रामस्थांनी उपस्थित पंचांना धारेवर धरले.
हेही वाचाःअभियंते लाच मागत असतील, तर कंत्राटदारांनी मला सांगावं…
पंचायत मंडळ गावाच्या विकासाबाबत गंभीर नसल्याचा आरोप
माकाझन ग्रामपंचायतीच्या बाजूला असलेल्या पंचायतीच्या सभागृहात रविवारी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेवेळी ग्रामसभेची नोटीस काढणाऱ्या सरपंचांसह उपसरपंचही उपस्थित राहिले नव्हते. पंचायत सचिवांनी पंचांपैकी कुणालातरी अध्यक्ष बनवून सभा घेण्याची सूचना केली. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी याला आक्षेप घेत पंचांसोबत वाद घातला. गेल्या चौदा महिन्यांपासून ग्रामसभा घेण्यात आलेली नाही. पंचायत मंडळ गावाच्या विकासाबाबत गंभीर नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. त्यानंतर केसिन वाझ या पंचांचा सभेचा अध्यक्ष करत सभा सुरू करण्यात आली.
हेही वाचाःकायद्याचा भंग करून हडफडेत जमिनीचे रूपांतरण!
नव्या इमारतीच्या कामाचा मुद्दाही ग्रामसभेत चर्चेला
दरम्यान, जुन्या पंचायतीच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या नव्या इमारतीच्या कामाचा मुद्दाही ग्रामसभेत चर्चेला आहे. ग्रामस्थांनी जुन्या पंचायतीच्या ठिकाणी उभारलेल्या नव्या इमारतीचे काम पूर्ण झाले का, याबाबत विचारणा केला असता अजूनही शेड उभारण्याची बाकी असल्याची माहिती देण्यात आली. यानंतर ग्रामस्थांनी नव्या इमारतीचे काम पूर्ण झालेले नसताना उद्घाटन कसे केले, असा सवाल केला. तसेच त्या इमारतीत पोस्ट कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली असतानाही अजूनही चावी त्यांना देण्यात आलेली नाही. चावी पोस्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांना देण्याची मागणीही करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थ बेनी दी आल्मेदा यांनी दिली.
हेही वाचाः‘द ग्रेट गामां’चा गुगलकडून सन्मान! वाचा सविस्तर…
मार्केट कॉम्प्लेक्स उभारण्याचा ठराव
पंचायतीला १५व्या वित्त आयोगातून ५० लाख रुपयांचा निधी मिळालेला आहे. या निधीतून पंचायत मंडळाने पंचायत घरावर पीओपी छप्पर घालत सुशोभिकरण करण्याचा ठराव घेतला होता. ग्रामसभेत ग्रामस्थांनी पंचायतीच्या छपराला पीओपी करण्याऐवजी गावातील शाळेच्या परिसरात असलेल्या जागेवर मार्केट कॉम्प्लेक्स उभारण्यात यावे, अशी मागणी लावून धरत ठराव संमत केला.
हेही वाचाः’हे’ आहेत पेट्रोल-डिझेल चे ‘नवे’ दर…