सत्तरीनंतर आता पेडण्यातील शेतकऱ्यांचा उठाव

मोपा विमानतळ लिंकरोडला विरोध

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

ब्युरो : गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पेडणे तालुक्याच्या सर्वांगिण विकासाचे गाजर दाखवून 90 लाख चौरसमीटर जमिन संपादन केल्यानंतर आता पुन्हा एकदा विमानतळ लिंक रोडसाठी आणखी काही लाख जमिन संपादन करण्याचा प्रस्ताव सरकारने जाहीर केलाय. मुळातच मोपा विमानतळासाठी संपादन केलेल्या जमिनीची भरपाई मिळालेली नाही आणि त्यात आता पुन्हा अतिरीक्त जमिन संपादन करण्याचे प्रयत्न सुरू झाल्याने पेडणे तालुक्यातील मोपा विमानतळ क्षेत्रातील प्रभावीत शेतकरी आक्रमक बनलेत. शेळ-मेळावलीतील आंदोलनापासून प्रेरीत होऊन आता या शेतकऱ्यांनीही बंडाचे निशाण हातात घेऊन सर्वंच प्रकल्पांना विरोध केलाय.

‘बुलडोझर आमच्यावरूनच न्यावा लागेल’

धारगळ सुकेकुळण ते नागझर तुळस्करवाडी अशी या लिंकरोडची आखणी करण्यात आलीय. मोपासाठी 90 लाख चौ.मी जमिन का हवी. हा विमानतळ 20 ते 30 लाख चौ.मीटरमध्ये सामावला जाऊ शकतो. विमानतळाच्या अनुषंगाने एअरोसीटी प्रकल्प इथे येईल,असं सांगितलं जातय. काय आहे हा एअरोसिटी प्रकल्प. एकापेक्षा एक प्रश्न करून तुळस्करवाडी मोपा येथील ग्रामसभेत ग्रामस्थांनी पंचायत मंडळाला चांगलेच धारेवर धरले. आमच्या जमिनी गेल्या तर अस्तित्वच बाद होईल आणि त्यामुळे रस्ता करायचाच असेल तर बुलडोझर आमच्यावर फिरवूनच जमिनीत जा, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.

पैसा नको, नोकऱ्या नको आमच्या जमिनीच हव्यात

आम्हाला भरपाई नको, सरकारी नोकऱ्या नको. आमच्या जमिनीत उत्पन्न करून आम्ही आमचे पोट भरू. इथे रस्ता आला तर घरे, काजू बागायती आणि पाण्याचे स्त्रोत नष्ट होतील. इथे शेती किंवा बागायती करणे अशक्य बनेल. आमच्या पोटावरच नांगर फिरवणारा हा विकास हवाच कशाला,असा सवाल ग्रामस्थांनी केला. पंचायत मंडळाने या प्रस्तावित रस्त्याला हरकत घेऊन ग्रामस्थांच्या भावनांची कदर करावी आणि सरकारला हा रस्ता नको, असे खडसावून सांगावे,अशी मागणी या ग्रामसभेत करण्यात आली. आमच्यावर भविष्यात आत्महत्या करण्याची वेळ आणू नका, असे भावनिक आवाहन श्यामसुंदर मयेकर यांनी केले.

तिळारीचे पाणी शेतीसाठी की विमानतळासाठी?

हरितक्रांतीच्या नावाने तिळारी धरण प्रकल्प उभारला. त्यासाठीही शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या. आता पाणी आले आणि शेती करणार तर ह्याच शेतजमिनी विमानतळासाठी संपादन केल्या जाताहेत आणि तिळारीचे हेच पाणी विमानतळासाठी वापरले जात आहे. ही शेतकऱ्यांची घोर फसवणूक आहे, अशी टीका ग्रामस्थांनी केलीय.

ठराव मंजूर

एअरोसिटी प्रकल्प नकोच. जमीन शेतकऱ्यांना परत करावी. जमिन गेलेल्यांना त्वरीत भरपाई मिळावी.

वारखंड नागझर पंचायत क्षेत्रातून तुळस्करवाडी मोपा प्रकल्पाकडे जाणाऱ्या रस्त्याला विरोध.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!