चोर्ला घाटातली दरड हटवली! १३ तासानंतर ठप्प असलेली वाहतूक पुन्हा सुरु

तब्बल १३ तास वाहतुकीचा खोळंबा

Goan Varta Live | प्रतिनिधी

वाळपई : गुरुवारी मध्यरात्री आणि शुक्रवारी पहाटे गोवा बेळगाव दरम्यानच्या चोर्ला घाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्यामुळे जवळपास 13 तास वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, दरडी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं. रात्री 8 वाजता रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आल्याची माहिती मिळतेय. तरीसुद्धा कोसळण्यात आलेल्या दरडी हटविण्याचे काम शनिवारी पुन्हा सुरु करण्यात येणार आहे. रात्री अंधारात आणि मुसळधार पावसामुळे दरड हटवण्याच्या कामात व्यत्यय येत असल्यामुळे शनिवारी हे काम पुन्हा पूर्ण करण्यात येणार आहे.

गेल्या चार दिवसापासून सत्तरी तालुक्यात आणि डोंगराळ भागांमध्ये मुसळधार पाऊस झालाय. गुरुवारी रात्री पावसाचा रोख वाढल्यामुळे गोवा-बेळगाव दरम्यानच्या चोर्ला घाट परिसरामध्ये दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. यामुळे पहाटे 6 वाजल्यापासून वाहतूक ठप्प झाली होती. बेळगाव भागातून गोव्याकडे येणारी आणि गोव्यातून बेळगावकडे जाणारी वाहने मोठ्या प्रमाणात अडकून राहिली होती. एकूण चार ठिकाणी दरडी कोसळण्याचे प्रकार घडले होते.

दरड कोसळण्याची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या महामार्ग व्यवस्थापनाकडून सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास दरडी हटविण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली. रात्री आठ वाजेपर्यंत काम युद्धपातळीवर सुरू होतं. यासाठी अनेक मशिनरी कामाला लावण्यात आल्या. जवळपास 1२ तासाहून अधिका काळ दरड हटवण्याचं काम केल्यानंतर अखेर रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. वाळपई पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर याच्या मार्गदर्शनाखाली हळूहळू वाहतूक सोडण्यात आली. तब्बल १२ तास या मार्गावर खोळंबलेल्या वाहनांची वाहतूक आता हळूहळू पूर्वपदावर येते आहे.

फक्त दरड नाही तर अनेक ठिकाणी झाडे पडल्यामुळे रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला होता. यंदा पावसाळापूर्व कामांतर्गत धोकादायक झाडे हटविण्यात न आल्यामुळे हे गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला जातोय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!